इरई धरणात 71 टक्के जलसाठा

पालकमंत्र्यांकडून धरणाची पाहणी

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
चंद्रपूर,
guardian-minister-inspects-the-dam इरई धरणामध्ये सद्यस्थितीत 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असले तरी संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, आगामी काळात पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
 

guardian-minister-inspects-the-dam 
 
गुरुवारी त्यांनी इरई धरणाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार विजय पवार, चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता संजय पखान, महेश राजूरकर आदी उपस्थित होते.
 
 
नागरिकांनी पाण्याचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. पाणी बचतीसाठी लोकसहभागातून व्यापक चळवळ उभी राहावी यासाठी प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण करून कोणत्याही गावात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्याही सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
 
 
वर्धा नदीतील उपलब्ध पाण्याचेही नियोजन करण्यात येत असून, आगामी काळात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक जलसाठा आरक्षित करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याची ग्वाहीही डॉ. उईके यांनी दिली.
 
इरई धरणाची सद्यस्थिती
 
उपलब्ध पाणीसाठा-
128.40 दलघमी (74.58 टक्के), मृत साठा-19.75 दलघमी, उपयुक्त साठा-108.64 दलघमी (71.29 टक्के).
 
 
मासिक पाणी वापर-
10 दलघमी (चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर शहर महानगरपालिका व बाष्पीभवन धरून)