मुलांचा खोकला दोन आठवड्यांपेक्षा जास्त टिकतोय? दुर्लक्ष करू नका; असू शकते गंभीर आजाराचे लक्षण!

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
childs cough बदलते हवामान, वाढते वायुप्रदूषण आणि वातावरणातील धूळ यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. विशेषतः श्वसनसंस्थेशी संबंधित तक्रारींमध्ये वाढ होत असून, अनेक मुलांना सतत खोकला, छातीत घरघर आणि श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. अनेकदा पालक या लक्षणांकडे साधी सर्दी किंवा हवामानातील बदल म्हणून पाहतात. मात्र, खोकला दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ कायम राहत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. श्वसनमार्गातील संसर्ग, ॲलर्जी, दमा किंवा क्षयरोग यांसारख्या आजारांमुळेही दीर्घकाळ खोकला येऊ शकतो. त्यामुळे वेळेत वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
 

childs cough 
 
प्रदूषणाचा मुलांच्या फुफ्फुसांवर परिणाम
लहान मुलांची फुफ्फुसे अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नसतात. तसेच प्रौढांच्या तुलनेत त्यांचा श्वास घेण्याचा वेग अधिक असतो. त्यामुळे वाहनांचा धूर, बांधकामांमधील धूळ आणि हवेत असलेले सूक्ष्म प्रदूषित कण त्यांच्या श्वसनमार्गात सहज प्रवेश करू शकतात. परिणामी श्वसनमार्गाला सूज आणि जळजळ होऊन खोकला, छातीत घरघर तसेच धाप लागण्याचा त्रास उद्भवू शकतो. विशेषतः दमा किंवा ॲलर्जीचा पूर्वीपासून त्रास असलेल्या मुलांमध्ये प्रदूषणाचा परिणाम अधिक जाणवू शकतो.
खोकल्यामागील कारण ओळखणे महत्त्वाचे
याबाबत मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे येथील वरिष्ठ नवजात शिशू व बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते, मुलांना वारंवार खोकला येत असेल, त्याची तीव्रता वाढत असेल किंवा तो बराच काळ टिकून राहत असेल, तर त्यामागील कारण शोधणे आवश्यक आहे. खोकल्यासोबत ताप, वेगाने श्वास घेणे, छातीत दुखणे, दूध किंवा अन्न घेण्यास त्रास होणे आणि असामान्य थकवा जाणवणे ही संसर्गाची लक्षणे असू शकतात. काही वेळा न्यूमोनियाची सुरुवातही सामान्य सर्दी-खोकल्यासारखी होते. त्यामुळे प्रत्येक खोकला प्रदूषणामुळेच होतो, असे समजणे योग्य नाही.
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असल्यास तपासणी आवश्यक
खोकला किती दिवसांपासून आहे, तो रात्रीच्या वेळी वाढतो का किंवा बाहेर गेल्यानंतर अधिक जाणवतो का, यावरून त्यामागील कारण शोधण्यास मदत होते. विषाणूजन्य संसर्गामुळे होणारा खोकला कालांतराने कमी होऊ शकतो. तर प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानंतर खोकला वाढण्याची शक्यता असते. मात्र, दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला कायम राहिल्यास क्षयरोगासह इतर संभाव्य कारणांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार छातीचा एक्स-रे आणि अन्य चाचण्या केल्या जाऊ शकतात. रात्री खोकला वाढणे, वारंवार छातीत घरघर होणे ही दम्याची किंवा ॲलर्जीची लक्षणेही असू शकतात.
खोकल्यासोबत ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा
मुलांना श्वास घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असतील, श्वास घेताना छाती आत ओढली जात असेल, ओठ निळसर दिसत असतील किंवा बोलताना व दूध पिताना त्रास होत असेल, तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. मुलाला असामान्य गुंगी येणे किंवा प्रतिसाद कमी होणे हीदेखील गंभीर लक्षणे आहेत. अशा परिस्थितीत घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्याची औषधे किंवा प्रतिजैविके देणेही टाळावे.
मुलांना खोकल्यापासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्याल?
मुलांचे श्वसन आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी काही साध्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करता येतो. हवेतील प्रदूषणाची पातळी अधिक असताना मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवणे टाळावे. सिगारेटचा धूर, वाहनांचा धूर आणि बांधकामांमधील धुळीपासून त्यांना दूर ठेवावे. वयानुसार आवश्यक लसीकरण वेळेत पूर्ण करावे.childs cough मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी आणि पुरेसे पाणी पिण्यास प्रोत्साहित करावे.
मुलांना वारंवार खोकला येत असेल किंवा त्यामुळे त्यांच्या झोपेवर, खाण्यापिण्यावर आणि दैनंदिन हालचालींवर परिणाम होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. खोकला आपोआप बरा होण्याची वाट पाहण्याऐवजी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळी निदान झाल्यास आजाराचे कारण समजून आवश्यक उपचार सुरू करणे शक्य होते.