हैदराबाद
bomb threat लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या नावाने पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमुळे हैदराबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काचीगुडा परिसरातील हॉटेल टुरिस्ट प्लाझा आणि काचीगुडा रेल्वे स्थानक येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी या ई-मेलमधून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २००८ मधील मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे भीषण हल्ला करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या हल्ल्यात किमान ३०० नागरिकांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. हैदराबादचे संयुक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) यांनी यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्र पाठवून संभाव्य धोक्याबाबत सतर्क केले आहे.

या धमकीच्या ई-मेलमध्ये दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी लतीफ भट आणि त्याच्या साथीदारांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हल्ला केला जाणार असल्याचा उल्लेख आहे. १८ नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील झांगलपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या कारवाईत सुरक्षा दलांनी लतीफ भट याला ठार केले होते. या कारवाईचा सूड उगवण्यासाठी हैदराबादमधील सार्वजनिक ठिकाणे आणि मालमत्तांना लक्ष्य करण्याचा इशारा धमकीच्या संदेशातून देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
धमकीनंतर काचीगुडा परिसरासह शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. हॉटेल्स, रेल्वे स्थानके, बस स्थानके तसेच धार्मिक स्थळांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. संभाव्य घातपात रोखण्यासाठी पोलिसांनी संशयित ठिकाणी घातपातविरोधी तपासणी मोहीम सुरू केली आहे. बेवारस वस्तू, संशयास्पद वाहने, व्यक्ती आणि असामान्य हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. याशिवाय, अन्य केंद्रीय सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
या प्रकरणाची माहिती देताना हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. संभाव्य बॉम्बहल्ल्यांबाबत धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने प्रतिबंधात्मक आणि सुरक्षाविषयक उपाययोजना सुरू केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमुख चौक, संवेदनशील परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची प्रत्यक्ष उपस्थिती वाढवण्यात आली आहे. दरम्यान, हा धमकीचा ई-मेल नेमका कोठून पाठवण्यात आला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले आहे. ई-मेलच्या तांत्रिक तपासातून पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, शहरात हाय अलर्ट लागू करण्यात आला असला तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावरून पसरणाऱ्या अप्रमाणित माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अशा संदेशांचा प्रसार करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न न करता तातडीने ११२ या आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा आणि पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.