इटलीत शाळांमध्ये बुरखा-नकाबला बंदी

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
रोम
Georgia Meloni
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारने देशातील शैक्षणिक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारी शाळांमध्ये बुरखा आणि नकाब घालण्यास प्रतिबंध करण्यासह वर्गातील विदेशी वंशाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर ३० टक्क्यांची मर्यादा घालणारे वादग्रस्त शैक्षणिक सुधारणा विधेयक सरकारने मंजूर केले आहे. या नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार युरोपर्यंत दंड भरावा लागू शकतो.



इटली सरकारकडून गेल्या काही महिन्यांपासून या बदलांची तयारी सुरू होती. अखेर संसदेच्या कनिष्ठ सभागृहात या विधेयकाला बहुमताने मंजुरी मिळाली. नव्या तरतुदींनुसार, विद्यार्थ्यांना शाळेत अशा प्रकारे चेहरा झाकता येणार नाही, ज्यामुळे त्यांची ओळख स्पष्ट होणार नाही. त्यामुळे वर्गांमध्ये बुरखा आणि नकाब परिधान करण्यावर प्रभावीपणे बंदी लागू होणार आहे.

संसदेच्या कनिष्ठ सभागृहात विधेयक मंजूर

इटलीच्या संसदेतील 'चेंबर ऑफ डेप्युटीज' या कनिष्ठ सभागृहात या विधेयकाच्या बाजूने १४२ मते पडली, तर विरोधात ११२ सदस्यांनी मतदान केले. चार सदस्य मतदानापासून अलिप्त राहिले. यापूर्वी २० नोव्हेंबर रोजी सिनेटमध्येही या विधेयकाला मंजुरी मिळाली होती. 'डिक्रीटो स्कुओला' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सुधारणांमुळे देशाच्या शैक्षणिक धोरणात महत्त्वाचे बदल होणार आहेत.या विधेयकातील आणखी एक महत्त्वाची तरतूद म्हणजे पहिल्या वर्षाच्या वर्गांमध्ये विदेशी वंशाच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे. मात्र, इटालियन भाषेवर चांगले प्रभुत्व असलेल्या विदेशी विद्यार्थ्यांना या मर्यादेतून सूट देण्यात आली आहे.विदेशी पालकांच्या मुलांना इटलीच्या शिक्षण पद्धतीशी जुळवून घेताना भाषेची अडचण येऊ नये, यासाठी विशेष इटालियन भाषा अभ्यासक्रम सुरू करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा शिकण्यास आणि शैक्षणिक वातावरणात सहजपणे सामावून घेण्यास मदत करणे, हा यामागील उद्देश आहे.मेलोनी सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नव्या तरतुदी भेदभावाला प्रोत्साहन देणाऱ्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारच्या मते, या सुधारणांमुळे २०२६-२७ हे शैक्षणिक वर्ष अधिक सुरळीतपणे राबविण्यास मदत होईल. तसेच नॅशनल रिकव्हरी अँड रेसिलीयन्स प्लॅनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना बळ मिळेल आणि विदेशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक एकत्रीकरण सुलभ होईल.या निर्णयाबाबत काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांच्या मते, विद्यार्थ्यांनी शाळेत चेहरा उघडा ठेवून उपस्थित राहणे आवश्यक आहे. कोणत्याही परंपरेच्या नावाखाली तरुण मुलींना स्वतःचा चेहरा झाकण्यास भाग पाडण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे त्यांनी म्हटले होते.वर्गात एखादाच विद्यार्थी इटालियन भाषा समजत नसेल, तर शिक्षक आणि इतर सहाध्यायांच्या मदतीने तो विद्यार्थी ही भाषा लवकर आत्मसात करू शकतो. त्यामुळे त्याला शैक्षणिक वातावरणात मिसळणेही सोपे होईल, असे मत मेलोनी यांनी व्यक्त केले होते.सरकारच्या या नव्या धोरणामुळे इटलीतील शाळांमध्ये धार्मिक पोशाख, विदेशी विद्यार्थ्यांचे प्रमाण आणि भाषिक समावेशन या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.