पंढरपूर
kartiki yatra 2026 कार्तिकी यात्रा २०२६ च्या सांगता समारंभानिमित्त शनिवारी (२८ नोव्हेंबर) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पारंपरिक प्रक्षाळ पूजा करण्यात येत आहे. आषाढी आणि कार्तिकी या प्रमुख यात्रांच्या काळात विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी जमते. या कालावधीत देवाच्या नित्योपचारांसह विविध धार्मिक विधी पार पडतात. यात्रेचा सोहळा संपल्यानंतर श्रींच्या दैनंदिन पूजाविधींमध्ये पुन्हा नियमितता आणण्याच्या उद्देशाने प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. मंदिराच्या धार्मिक परंपरेत या विधीला विशेष स्थान आहे.

या पूजेचे औचित्य साधून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासह संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक पुष्पसजावटीने नवा साज चढविण्यात आला आहे. अमोल शेरे आणि अभिजित मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही देखणी सजावट साकारली. यासाठी तब्बल पाच हजार किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे. गुलाब, झेंडू, शेवंती, लिली, गलांडा, आष्टर, ऑर्किड, गॅलोडा, जिनो आणि कार्नेशियन यांसह तीसपेक्षा अधिक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा सजावटीत समावेश आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या आकर्षक पानांचाही वापर करून कलात्मक पुष्परचना उभारण्यात आल्या आहेत.
फुलांच्या विविध रंगसंगती आणि कल्पक मांडणीमुळे श्री विठ्ठल मंदिर, श्री रुक्मिणी माता मंदिर तसेच संपूर्ण मंदिर परिसराचे रूप अधिकच खुलले आहे. प्रक्षाळ पूजेच्या धार्मिक सोहळ्यासोबतच या आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसर भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला आहे. मंदिर व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सजावटीची माहिती दिली.
दरम्यान, फुलांनी सजलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पाहण्यासाठी शनिवारी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष या भव्य पुष्पसजावटीने वेधून घेतले. प्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने धार्मिक परंपरेचा अनुभव घेतानाच मंदिराचे हे मनोहारी रूप पाहण्याची संधी भाविकांना मिळाली, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी दिली.