बरेली,
bareilly उत्तर प्रदेशातील बरेली येथे धर्मांतर करून विवाह केल्याची घटना समोर आली आहे. आमला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महमूदपूर गावातील नर्गिस या तरुणीने सनातन धर्म स्वीकारत आपले नाव बदलून इच्छा देवी असे ठेवले. त्यानंतर तिने गावातीलच आकाश कश्यप याच्याशी विवाह केला. विवाहापूर्वी सुभाषनगरमधील मदिनाथ परिसरातील श्री अगस्त्य मुनी आश्रमात धार्मिक विधी पार पडले. गंगाजल आणि गोमूत्र प्राशन केल्यानंतर तिने गायत्री मंत्राचा जप केला. आपण कोणत्याही दबावाशिवाय स्वतःच्या इच्छेने धर्मांतर केल्याचा दावा तरुणीने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश आणि नर्गिस यांची ओळख सुमारे दीड वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला सोशल मीडियावर सुरू झालेला संवाद पुढे मैत्री आणि त्यानंतर प्रेमात बदलला. नर्गिसच्या म्हणण्यानुसार, तिनेच सर्वप्रथम आकाशला संदेश पाठवून संवाद सुरू केला होता. पुढे तिने आकाशसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानेही त्याला संमती दिली. मात्र, दोघांच्या कुटुंबीयांकडून या विवाहाला विरोध करण्यात आला. यापूर्वी नर्गिस आकाशसोबत दिल्लीला गेली होती. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधानंतर तिला पुन्हा परत पाठवण्यात आले. त्यानंतर ती पुन्हा आकाशकडे आली आणि दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
विवाहापूर्वी मदिनाथ येथील श्री अगस्त्य मुनी आश्रमात शुद्धीकरण विधी आयोजित करण्यात आला होता. आश्रमाचे महंत पंडित के. के. शंखधर यांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रोच्चारांसह धार्मिक विधी पार पडले. यावेळी नर्गिसने गंगाजल आणि गोमूत्र प्राशन केले तसेच तीन वेळा गायत्री मंत्राचा जप केला. त्यानंतर तिने आपले नाव बदलून इच्छा देवी ठेवण्याची घोषणा केली. आपण गेल्या चार ते पाच वर्षांपासून सनातन धर्माचे पालन करत असल्याचा दावा इच्छा देवीने केला आहे. तसेच धर्मांतर आणि विवाहाचा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतल्याचेही तिने स्पष्ट केले.