लंडन,
magnetic-nanorobots-medical-researchभारतीय आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ चुंबकीय पद्धतीने नियंत्रित नॅनोरोबोट्स विकसित करणार आहेत. हे नॅनोरोबोट्स शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचू शकतील, यामुळे भविष्यात गंभीर आजारांवर उपचार करण्यास आणि थेट बाधित भागापर्यंत औषधे पोहोचवण्यास मदत होणार आहे.
ब्रिटनमधील इंपीरियल कॉलेज लंडन आणि बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील शास्त्रज्ञ या प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत. इंपीरियल कॉलेजने या आठवड्यात या भागीदारीची घोषणा केली. या संशोधनात सिंथेटिक बायोलॉजी आणि नॅनोरोबोटिक्स यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट अत्यंत लहान चुंबकीय मोटर्सने सुसज्ज असलेल्या कृत्रिम पेशी तयार करणे आहे.
या मोटर्स लहान इंजिनप्रमाणे कार्य करतील आणि कृत्रिम पेशींना कठीण परिस्थितीतही हालचाल करण्यास मदत करतील. इंपीरियल कॉलेजने निवेदनात म्हटले की, कृत्रिम पेशी म्हणजे शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केलेल्या रचना आहेत. त्यांच्यामध्ये सजीव पेशींचे काही गुणधर्म आणि कार्यात्मक क्षमता असतात. तथापि, बहुतांश कृत्रिम पेशी स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत किंवा स्वतःहून विशिष्ट ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. शास्त्रज्ञ आता चुंबकीय नॅनोमोटर्स बसवून ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
दुर्धर आजारावर मात शक्य
प्रकल्पात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील प्राध्यापक अंबारिस घोष यांच्या नेतृत्वात संशोधक चुंबकीय नॅनोरोबॉट्सवर काम करत आहे. संशोधकांनी अशा प्रणाली विकसित केल्या आहेत, ज्या मानवी रक्त, ऊती आणि अगदी सजीव पेशींमध्येही प्रवेश करू शकतात. घोष यांच्या मते, त्यांच्या टीमने जटिल जैविक वातावरणात चुंबकीय नॅनोरोबॉट्स नियंत्रित करायला शिकले आहे. तथापि, हे रोबोट्स प्रामुख्याने अजैविक पदार्थांपासून बनलेले आहेत. या प्रकल्पामुळे दुर्धर आजारावर उपचार करणे आणि त्यावर मात करणे शक्य होईल.
औषधांचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत
या तंत्रज्ञानामुळे एखादे औषध शरीरात प्रवेश करते, तेव्हा त्याचे रेणू रक्तप्रवाहाद्वारे शरीराच्या विविध भागांमध्ये पसरू शकतात, आणि कधीकधी अशा अवयवांवर परिणाम करतात ज्यांना उपचारांची आवश्यकता नसते. अशा प्रकरणांमध्ये, बाह्य चुंबकीय क्षेत्राचा वापर करून कृत्रिम पेशींना शरीराच्या विशिष्ट भागापर्यंत पोहोचवता येऊ शकते, जिथे त्या त्यांच्यातील औषध किंवा इतर पदार्थ सोडू शकतात. यामुळे औषधाची कमी मात्रा वापरण्याची शक्यता वाढू शकते आणि नको असलेले दुष्परिणाम कमी होऊ शकतात.