मुंबई
maharashtra fda action शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या खाद्यविक्री केंद्रांविरोधात राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर पाऊल उचलले आहे. शाळांच्या परिसरात नियमांचे उल्लंघन करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या उपहारगृहांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल ते १९ नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील ४२२ शाळा आणि त्यांच्या आसपासच्या परिसरांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत नियमबाह्य कामकाज करणारी ६९ उपहारगृहे बंद करण्यात आली, तर १९ उपहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना आरोग्यदायी, सकस आणि सुरक्षित खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, हा या विशेष तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. शाळेच्या ५० मीटर परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण १३८ उपहारगृहांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६९ केंद्रे बंद करण्यात आली असून १९ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
याशिवाय अन्य प्रकारच्या नियमभंगाची २१ उपहारगृहांमध्ये प्रकरणे आढळली. त्यापैकी १० उपहारगृहे बंद करण्यात आली, तर दोन उपहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले.
कोकण विभागात सर्वाधिक कारवाई
राज्यातील विभागनिहाय कारवाईचा विचार करता कोकण विभागात सर्वाधिक तपासण्या करण्यात आल्या. या विभागातील १५९ शाळांची तपासणी झाली. शाळांच्या ५० मीटर परिसरातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६४ उपहारगृहांपैकी २७ उपहारगृहे बंद करण्यात आली, तर एका उपहारगृहाचा परवाना निलंबित करण्यात आला. अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन उपहारगृहांपैकी एका उपहारगृहावरही बंदची कारवाई झाली.
नाशिकमध्ये २३ उपहारगृहे बंद
नाशिक विभागात ६९ शाळांची तपासणी करण्यात आली. यावेळी शाळांच्या परिसरातील नियमभंग करणाऱ्या २७ उपहारगृहांपैकी २३ उपहारगृहे बंद करण्यात आली, तर १४ उपहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले. याशिवाय अन्य प्रकारचे उल्लंघन करणाऱ्या नऊ उपहारगृहांपैकी सहा बंद करण्यात आली आणि तीन उपहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले.
नागपूर, पुणे आणि अमरावतीतही कारवाई
छत्रपती संभाजीनगर विभागात ६९ शाळांची तपासणी करून परिसरातील आठ उपहारगृहे बंद करण्यात आली. नागपूर विभागात ४८ शाळांची तपासणी करण्यात आली. यामध्ये शाळांच्या परिसरातील दोन उपहारगृहांवर कारवाई करून ती बंद करण्यात आली. अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणखी एका उपहारगृहाला टाळे ठोकण्यात आले.पुणे विभागात ४३ शाळांची तपासणी झाली. येथे नियमभंग करणाऱ्या २९ उपहारगृहांपैकी पाच उपहारगृहे बंद करण्यात आली. अमरावती विभागात ३२ शाळांच्या परिसराची तपासणी करण्यात आली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आठ उपहारगृहांपैकी दोन बंद करण्यात आली, तर चार उपहारगृहांचे परवाने निलंबित झाले. अन्य प्रकारच्या नियमभंगाच्या तीन प्रकरणांपैकी दोन उपहारगृहांवर बंदची कारवाई करण्यात आली.
मुंबईत दोन उपहारगृहांवर कारवाई
मुंबई विभागात तुलनेने कमी तपासण्या आणि कारवाई झाली. येथे केवळ दोन शाळांच्या परिसराची तपासणी करण्यात आली. या तपासणीत शाळांलगतच्या परिसरात नियमांचे उल्लंघन करणारी दोन उपहारगृहे आढळली. प्रशासनाने या दोन्ही उपहारगृहांना बंद केले.विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या परिसरातील खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या उपहारगृहांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे.