राज्य शिक्षक पुरस्कारांचा मान १२३ शिक्षकांना ३ डिसेंबरला मुंबईत गौरव सोहळा

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
मुंबई
maharashtra state teacher awards
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातील १२३ शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या वर्षासाठीच्या ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारां’साठी विविध प्रवर्गांतील शिक्षकांची निवड केली आहे. राज्य निवड समितीच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली असून, येत्या ३ डिसेंबर २०२६ रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.



समाजाप्रती निःस्वार्थ भावनेने कार्य करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष योगदान देणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्कार योजनेचा प्रमुख हेतू आहे. राज्य निवड समितीच्या २५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत पुरस्कारार्थी शिक्षकांची अंतिम निवड निश्चित करण्यात आली.यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड झालेल्या १२३ शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागातील ३८, तर माध्यमिक विभागातील ३९ शिक्षकांचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १९ प्राथमिक शिक्षकांचीही निवड करण्यात आली आहे.

याशिवाय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका प्रवर्गात आठ, विशेष शिक्षक (कला) प्रवर्गात आठ आणि विशेष शिक्षक (क्रीडा) प्रवर्गात आठ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यांग शिक्षक किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील एका शिक्षकाची, तर स्काऊट आणि गाईड प्रवर्गातून प्रत्येकी एका शिक्षकाची निवड करण्यात आली आहे.

पुरस्काराची रक्कम १० हजार रुपये

राज्य शिक्षक पुरस्कार योजना महाराष्ट्रात १९६२-६३ पासून राबविण्यात येत आहे. २०२१-२२ पासून या योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले असून, तेव्हापासून ‘क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ या नावाने योजना राबविली जात आहे.

या पुरस्कारासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना संबंधित नियमांनुसार एक लाख रुपये देण्यात येतात.

शासनाच्या संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध

पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व १२३ शिक्षकांची प्रवर्गनिहाय यादी राज्य सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या शिक्षकांना ३ डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या समारंभात सन्मानित केले जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.