धारणी,
melghat-bear-attacks-beehivesकष्टाने उभा केलेला रोजगार डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होताना शासनाने ‘मधाचे गाव’ म्हणून घोषित केलेल्या मेळघाटातील आमझरी परिसरातील महिलांना पाहावा लागत आहे. मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेऊन मध संकलनातून आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग शोधणाऱ्या आदिवासी महिलांच्या मधपेट्यांवर आता अस्वलांनी हल्ला सुरू केला आहे. अस्वल मधपेट्या फोडून त्यातील मध चाटून मारत आहेत, त्यामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सोबतच माकडांचाही उपद्रव वाढल्याने मधमाशी पालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. शासनाच्या मदतीने सुरू झालेल्या रोजगारावर अस्वल व माकडांच्या दहशतीमुळे अडचण येत असल्याने महिलांनी आता मधपेट्यांच्या सुरक्षेसाठी कुंपण किंवा झटका मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
आमझरी परिसरातील वनसंकुलात मोठ्या प्रमाणात मधपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय काही महिलांनी व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात, तर काहींनी घराच्या अंगणातच मधपेट्या ठेवल्या आहेत. या पेट्यांमध्ये मधमाश्यांची वस्ती चांगली वाढली असून मधाचे संकलनही मोठ्या प्रमाणात होत आहे. मध काढणी व विक्रीची वेळ आली, तेव्हाच अस्वलांनी पेट्या फोडण्यास सुरुवात केली. रात्रीच्या अंधारातच नव्हे, तर दिवसाढवळ्याही अस्वल येऊन मधपेट्यांचे नुकसान करीत आहेत. पेट्यांतील मध खाण्यासोबतच मधमाश्यांची वस्तीही उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे महिलांच्या अनेक दिवसांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. अस्वलांना मधमाश्यांच्या डंखा फारसा फरक पडत नाही, त्यामुळे ते बिनधास्त मधपेट्या फोडत आहेत.
त्याच परिसरातील माकडांनीही मधपेट्या फोडण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, शेतात किंवा घराच्या परिसरात ठेवलेल्या मधपेट्याही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. काही ठिकाणी मधपेट्यांमुळे शेतकऱ्यांना नुकसान होत असल्याची महिलांची तक्रार आहे. अस्वलांना मधपेट्यांची सवय लागल्याने, भविष्यात मानवी वस्तीकडे त्यांचा वावर व माणसांवर हल्ला होण्याचा धोका वाढू शकतो, अशी भीतीही महिलांनी व्यक्त केली आहे.
बचत गटाच्या माध्यमातून मधमाशी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या महिलांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. अस्वलांना मधपेट्या फोडण्याची सवय लागली आहे आणि शेतात ठेवलेल्या पेट्यांचेही नुकसान होत आहे. भविष्यात अस्वलांकडून माणसांवरही हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिलांचा हा व्यवसाय सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने झटका मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संगीता बेलसरे यांनीही मधमाशी पालनातून चांगला रोजगार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.