कन्नूर,
murmu-indigenous-warships-submarinesसागरी सुरक्षा ही अर्थव्यवस्थेशी जोडली असल्याने सागरी प्रदेशातील धोका अर्थव्यवस्था वाढीसाठी आव्हान ठरत आहे. त्यामुळे सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले.केरळम् च्या कन्नूर जिल्ह्यातील एझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीच्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती मुर्मू उपस्थित होत्या. अकादमीच्या २०२६ च्या सत्राचा भाग असलेला हा समारंभ शनिवारी एझिमाला येथील परेरा परेड मैदानावर आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या आणि निरीक्षण अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी आपल्या संबोधनात त्यांनी म्हटले की, आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात सागरी क्षेत्राचे महत्त्व सातत्याने वाढत आहे.
जागतिक व्यापाराचा मोठा भाग सागरी मार्गांनी केला जातो. त्यामुळे, या मार्गांची सुरक्षा देशांच्या आर्थिक सुस्थितीशी आणि सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेली आहे. जहाजांच्या वाहतुकीत कोणताही व्यत्यय आल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात आणि सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो आणि पर्यायाने याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होतो. त्यामुळे देशाला इतर देशांवर अवलंबून न राहता स्वदेशी युद्धनौका, पाणबुड्यांची निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.
विकसित भारताचे स्वप्न आकड्यांपुरते मर्यादित नाही
जग वेगाने बदलत असताना नवीन तंत्रज्ञान युद्ध आणि सागरी सुरक्षेचे स्वरूप बदलत आहे. भविष्यातील सर्व आव्हानांचा अंदाज लावणे अशक्य आहे, परंतु प्रशिक्षण, अनुकूलनक्षमता आणि समर्पणाने त्यांचा सामना करता येतो. मजबूत, समृद्ध आणि विकसित भारत घडवणे हे देशाच्या सर्व प्रयत्नांचे अंतिम उद्दिष्ट आहे. विकसित भारताचे स्वप्न केवळ आर्थिक वाढ किंवा विकासाच्या आकड्यांपुरते मर्यादित नाही, तर एक असा देश निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे, जिथे प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटेल, प्रगतीच्या संधी मिळतील आणि तो सन्मान व आत्मसन्मानाने जीवन जगू शकेल.
महिला अधिकाऱ्यांच्या सहभागाचे कौतुक
प्रशिक्षणार्थींमध्ये अनेक तरुण महिलांच्या उपस्थितीबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, त्यांचा सहभाग संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. महिलांनी हे सिद्ध केले की दृढनिश्चय, धैर्य आणि क्षमतेला कोणतीही सीमा नसते. त्यांची कामगिरी इतर तरुण महिलांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि राष्ट्रसेवेत जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी प्रेरणा देईल. भारतीय नौदल अकादमीतून एकूण ४२७ अधिकारी प्रशिक्षणार्थी कमिशन अधिकारी म्हणून पदवीधर झाले.