नागपूर,
nagpur-nmc-ai-excellence-awardनागपूर महानगरपालिकेच्या डिजिटल प्रशासनाच्या प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर मोठी दाद मिळाली आहे. विकासकामांच्या व्यवस्थापनासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम’ला ‘द इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड्स फॉर एंटरप्राइज टेक एक्सलन्स २०२६’ अंतर्गत ‘एंटरप्राइज एआय ट्रान्सफॉर्मेशन एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातून आलेल्या सुमारे दोन हजार नामांकनांमधून नागपूर मनपाच्या या प्रणालीची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
मुंबई येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मनपाचे अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम. आणि माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्निल लोखंडे यांनी महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या मार्गदर्शनात तसेच आयुक्त डॉ. विपीन यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला.
मनपाने विकासकामांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी १ सप्टेंबर २०२६ पासून ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली. यामध्ये विकासकामांच्या प्रस्तावापासून अंदाजपत्रक, तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी, निविदा, कार्यादेश आणि देयक अदा करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया एकाच व्यासपीठावर आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे कागदपत्रांवरील अवलंबित्व कमी होऊन प्रत्येक टप्प्याचा डिजिटल मागोवा घेणे शक्य झाले आहे.
अल्पावधीत हजारो कामांची नोंद
या प्रणालीवर आतापर्यंत ५ हजार ८७० विकासकामांची नोंद करण्यात आली आहे. २५ हजार ४५६ ई-अप्रूव्हल्स पूर्ण झाले असून, २०३ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केवळ ३० दिवसांत ८७ हजार ७८२ प्रशासकीय कार्यवाहींची नोंद झाली आहे. प्रणालीवर नोंदविलेल्या कामांची अंदाजित किंमत ४८६ कोटी रुपये असून, ६७७.२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय ५ हजार ४३८ अंदाजपत्रके, ३ हजार ६०३ तांत्रिक मान्यता आणि २ हजार ८३ प्रशासकीय मान्यतांची नोंद झाली आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविणार
लोकप्रतिनिधी, अभियंते, अधिकारी, कंत्राटदार, वित्त व लेखापरीक्षण विभाग अशा विविध घटकांना या प्रणालीशी जोडण्यात आले आहे. आगामी काळात अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, विकासकामांच्या ठिकाणांचे जीआयएस मॅपिंग, डिजिटल बजेट, कामांच्या गुणवत्तेचे परीक्षण, डिजिटल ऑडिट आणि नागरिकांचा सहभाग यांसारख्या सुविधा विकसित करण्याचे मनपाचे नियोजन आहे.
एकाच डिजिटल व्यासपीठावर सर्व प्रशासकीय प्रक्रिया आणण्याच्या या उपक्रमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने नागपूर महानगरपालिकेच्या डिजिटल प्रशासनाच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.