नागपूर
nagpur tragedy आईच्या निधनाचे दुःख अद्याप ताजे असतानाच नियतीने नरदोडकर कुटुंबावर आणखी एक आघात केला. आईच्या बाराव्याच्या धार्मिक विधीची तयारी सुरू असतानाच मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आईच्या निधनानंतर अवघ्या १२ दिवसांत मुलाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अभिजित मुकुंद नरदोडकर (४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या आई मेधा नरदोडकर या गेल्या काही काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. आईच्या आजारपणात तिची काळजी घेण्याची जबाबदारी अभिजित यांनी स्वतःकडे घेतली होती. गेल्या दोन वर्षांपासून ते आईची पूर्णवेळ सेवा करीत होते. औषधोपचारांपासून दैनंदिन गरजांपर्यंत प्रत्येक गोष्टीची ते काळजी घेत होते.
बारा दिवसांपूर्वी मेधा नरदोडकर यांचे निधन झाले. आईसोबतचा दीर्घ सहवास आणि तिच्या आजारपणात घेतलेली काळजी यामुळे अभिजित यांना तिच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का बसला होता. आईच्या जाण्यानंतर ते कमालीचे अस्वस्थ राहत होते. नातेवाइकांशीही फारसे बोलत नव्हते. आईच्या विरहाचे दुःख ते मनातच ठेवत असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
बाराव्याच्या तयारीतच काळाचा घाला
गुरुवारी सकाळी घरात मेधा नरदोडकर यांच्या बाराव्या दिवसाच्या धार्मिक विधींची तयारी सुरू होती. कुटुंबीय या तयारीत व्यस्त असतानाच अभिजित यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाच्या दुःखातून कुटुंबीय सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच मुलाच्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.अभिजित यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील मुकुंद आणि भाऊ अनुराग असा परिवार आहे. एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींचे अवघ्या १२ दिवसांच्या अंतराने निधन झाल्याने नरदोडकर कुटुंबाच्या दुःखात परिसरातील नागरिकही सहभागी झाले आहेत.