नागपूर
prohibited pills in nagpur drug export case आरोग्यपूरक उत्पादने असल्याचे भासवून त्याआड प्रतिबंधित औषधांची अमेरिकेत निर्यात केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने नागपुरातील एका औषध निर्यातदाराच्या कार्यालयावर छापा टाकून तब्बल ३० हजार प्रतिबंधित गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी औषध निर्यातदार लोकेश शाडी (४५) याला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाचे धागेदोरे नागपुरातील आणखी चार ते पाच मोठ्या औषध निर्यातदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, संबंधित निर्यातदारही तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमेरिकेत पाठवण्यात आलेल्या औषधांच्या एका खेपेची तेथील यंत्रणांनी तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित औषधे आढळून आल्याचे समोर आले. यानंतर अमेरिकेतील संबंधित यंत्रणांनी भारतीय तपास यंत्रणांना याबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे एनसीबीने तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर नागपुरातून होणाऱ्या औषध निर्यातीच्या व्यवहारांची तपासणी करण्यात आली. आरोग्यपूरक उत्पादनांच्या नावाखाली प्रतिबंधित औषधांची निर्यात होत असल्याचा संशय याच तपासातून बळावला.
या प्रकरणी एनसीबीच्या मुंबई पथकाने २५ नोव्हेंबर रोजी नागपुरातील मध्यवर्ती मार्गावरील अग्रसेन चौकाजवळ असलेल्या ‘डीप हेल्थकेअर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला. संबंधित कंपनी औषध निर्यातीचा व्यवसाय करते. लोकेश शाडी हा गेल्या जवळपास दहा वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती आहे. कार्यालयाची झडती घेतल्यानंतर पथकाला तीन हजार पट्ट्यांमध्ये ठेवलेल्या एकूण ३० हजार प्रतिबंधित गोळ्या आढळून आल्या. ही औषधे आरोग्यपूरक उत्पादने असल्याचे दर्शवून अमेरिकेत पाठवली जात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
कारवाईनंतर एनसीबीच्या पथकाने लोकेश शाडी याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी एनसीबीने त्याचा पारगमन कोठडी आदेश मिळवला आणि त्याला चौकशीसाठी मुंबईला नेले. जप्त करण्यात आलेल्या औषधांचा पुरवठा नेमका कोठून झाला, त्यांची निर्यात करण्यासाठी कोणती कागदपत्रे वापरण्यात आली आणि या संपूर्ण व्यवहारामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
दरम्यान, या कारवाईमुळे नागपुरातील औषध निर्यात क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शहरातील आणखी चार ते पाच मोठे औषध निर्यातदार तपास यंत्रणेच्या संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिबंधित औषधांच्या निर्यातीचे जाळे किती व्यापक आहे, या व्यवहारांमागे आणखी कोणत्या व्यक्ती किंवा कंपन्या आहेत आणि या प्रकारात इतर कोणाचा सहभाग आहे, हे आगामी तपासातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एनसीबीच्या या कारवाईमुळे नागपुरातून परदेशात होणाऱ्या औषध निर्यातीच्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू झाली आहे.