नवी दिल्ली,
ncp-delimitation-bill-standमतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही उपस्थित राहणार नाही, असे कळते आहे. शरद पवार यांच्या तब्येतीचे कारण देऊन सुप्रिया सुळे यांनी बैठकीला जाण्याचे टाळले. दुसरीकडे खासदार निलेश लंके दिल्लीला बैठकीसाठी जाणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनीही ऐनवेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिल्याने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना थेटपणे दुजोरा मिळालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेने इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे.
गेल्यावेळी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर होऊ नये यासाठी इंडिया आघाडीने एकजुटीने प्रयत्न केले. इंडिया आघाडीच्या एकसंधपणामुळे भाजपला बॅकफूटला जावे लागले. मात्र यावेळी छोट्या पक्षांशी बोलून, त्यांना राजी करून केंद्र सरकारने विधेयक आणल्याचे दिसून येते. यंदा द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, राजद, तृणमुलचा बंडखोर गट असे पक्ष केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा मसुदा आल्याशिवाय पाठिंबा देणार की नाही यार चर्चा करणे बरोबर नाही, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली होती. मात्र आता इंडिया आघाडीने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारून राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षपणे पाठिंब्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.