हिंगणघाट,
orders-issued-by-the-sub-divisional-magistrate कवडघाट परिसरातील वणा नदीतून होणारे अवैध वाळू उत्खनन, साठवणूक आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आकाश अवतारे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश २६ नोव्हेंबर २०२६ पासून २५ जानेवारी २०२७ पर्यंत लागू राहणार आहेत. या आदेशामुळे वणा नदीतील अवैध वाळू व इतर गौण खनिज उत्खनन, साठवणूक आणि वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
वणा नदी ही हिंगणघाट शहरातील दीड लाख नागरिकांसह परिसरातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठा योजनांचा प्रमुख जलस्त्रोत आहे. जिल्ह्यात संभाव्य टंचाईसदृश स्थिती असताना नदीतील अनियंत्रित उत्खननामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, नदीकाठच्या जमिनी, पूल तसेच सार्वजनिक मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच उत्खननामुळे नदीत खोल खड्डे निर्माण होऊन नागरिक व जनावरांच्या जीवितास धोका संभवतो. सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
कवडघाट येथील संपूर्ण वणा नदीपात्र, नदीकाठचा १०० मीटर परिसर तसेच हिंगणघाट न.प.च्या पाणी उपसा केंद्राच्या (इंटेक वेल) वरील व खालील बाजूस प्रत्येकी एक किमीपर्यंत नदीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हे निर्बंध लागू राहतील. या प्रतिबंधित क्षेत्रात गौण खनिज उत्खनन, साठवणूक अथवा वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक, टिप्पर, डंपर आदी वाहनांसह जेसीबी, पोकलेन, सक्शन पंप, बोटी व तत्सम यंत्रसामग्री नदीपात्रात नेणे किंवा उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
शासकीय कर्तव्यावर असलेले महसूल, पोलिस, नगर परिषद, पाटबंधारे व इतर शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि त्यांची वाहने, नगर परिषद व ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांशी संबंधित कामे, सक्षम प्राधिकाऱ्याची वैध परवानगी व महाखनिज प्रणालीवरील ई-पासधारकांना परवान्यातील अटी व शर्तींच्या अधीन राहून सूट देण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, अन्त्यविधी व धार्मिक विधींसाठी जाणारे नागरिक आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीकामासाठी वाळू वाहतूक न करता जाणारे वाहने यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.