पंतची ऐतिहासिक कामगिरी; स्टोक्सला टाकले मागे!

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
क्राइस्टचर्च,
pants-historic-achievement भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. फलंदाजीमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी एका षटकारासह त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. या कामगिरीसह त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स याला मागे टाकले आहे.
 
pants-historic-achievement
 
क्राइस्टचर्च येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पंतने २३ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने एक षटकार लगावला. त्यामुळे डब्ल्यूटीसीमधील त्याच्या एकूण षटकारांची संख्या ८९ झाली. विशेष म्हणजे, पंतने अवघ्या ४४ कसोटी सामन्यांमध्ये आणि ७६ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. यापूर्वी हा विक्रम बेन स्टोक्सच्या नावावर होता. स्टोक्सने ६४ सामन्यांतील ११७ डावांमध्ये ८८ षटकार मारले आहेत.
 
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंत ८९ षटकारांसह पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बेन स्टोक्स ८८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा रोहित शर्मा ५६ षटकारांसह तिसऱ्या, शुभमन गिल ४८ षटकारांसह चौथ्या, तर यशस्वी जैस्वाल ४५ षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
 
दरम्यान, कसोटी क्रिकेटच्या एकूण इतिहासातही पंतची कामगिरी उल्लेखनीय आहे. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या दुसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर १०९ षटकार आहेत. इंग्लंडचा बेन स्टोक्स १३८ षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. स्टोक्सचा हा विक्रम मोडण्यासाठी पंतला आणखी ३० षटकारांची आवश्यकता आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये पंतच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.