नवी दिल्ली,
parliament-session-resumes-2026केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक पुन्हा बोलवण्याची विनंती केली आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लोकसभेचे कामकाज 30 नोव्हेंबर 2026 पासून आणि राज्यसभेचे कामकाज 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर 3 डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहांची कार्यवाही समाप्त होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, हे कामकाज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कार्यवाहीचाच एक भाग असेल. मात्र, हा कार्यक्रम सभागृहाच्या कामकाजाच्या गरजांवर अवलंबून राहणार आहे.
या घोषणेनंतर काँग्रेसने आगामी संसदीय बैठकीसाठी आपली रणनीती ठरवण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजता दिल्लीत संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संभाव्य अधिवेशनासंदर्भात पक्षाची भूमिका आणि तयारीवर सखोल चर्चा केली जाणार आहे.
संसदेची ही प्रस्तावित बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर आणि महिला आरक्षण लागू करण्यावरून जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही या विषयावर चर्चा झाली असून, पंतप्रधानांनी मंत्र्यांना आगामी संसदीय बैठकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
महिला आरक्षणाला निवडणूक मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी जोडणारे संविधान दुरुस्ती विधेयक यंदा 17 एप्रिल रोजी झालेल्या विशेष सत्रात लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. त्यावेळी या विधेयकाला आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळू शकले नव्हते. हे विधेयक मंजूर न झाल्यापासूनच देशात मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेबाबत आणि लोकसभेच्या जागा वाढवण्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे.