१ डिसेंबरपासून अभय योजना; जुन्या दंडाच्या निपटाऱ्याची संधी
दिनांक :28-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
traffic challan वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे दंडाची थकबाकी असलेल्या वाहनचालकांना राज्य सरकारने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र वाहतूक पोलिस चालान अभय योजना-२०२६’ अंतर्गत थकीत ई-चालानच्या रकमेवर २० टक्के सवलत मिळणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून ही योजना लागू होणार असून, जुन्या दंडासह योजनेच्या कालावधीत जारी होणाऱ्या पात्र चालानांवरही सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
अनेक वाहनचालकांकडे वर्षानुवर्षे वाहतूक दंडाची थकबाकी आहे. अशा प्रलंबित चालानांचा निपटारा व्हावा आणि वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरावी, या उद्देशाने सरकारने ही योजना आणली आहे. योजनेची अंमलबजावणी दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २१ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जारी झालेल्या पात्र चालानांचा समावेश असेल. १ डिसेंबरपर्यंत ज्या चालानांची रक्कम थकीत असेल, त्यांचा निपटारा करताना निर्धारित तडजोड रकमेवर २० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे जुन्या दंडाची थकबाकी भरणाऱ्या वाहनचालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
सर्वच चालानांना सवलत नाही
अभय योजनेचा लाभ सर्व प्रकारच्या वाहतूक दंडांना आपोआप मिळणार नाही. सरकारने निश्चित केलेल्या पात्र चालानांनाच ही सवलत लागू असेल. त्यामुळे दंड भरण्यापूर्वी वाहनचालकांनी आपल्या चालानची पात्रता आणि अधिकृत नियमावली तपासणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी योजनेच्या अंमलबजावणीनंतर नागपूरसह राज्यातील वाहनचालकांना थकीत दंडाचा निपटारा करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली चालानांची थकबाकी भरण्यासाठी वाहनचालकांना आता १ डिसेंबरपासून दिलासा मिळणार आहे.