कोतवालांच्या नोंदीत पाचव्या प्रजातीची भर

वर्धेत प्रथमच आढळला दुर्मिळ केशराज कोतवाल

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
वर्धा,
rare-keshraj-kotwal कोकण आणि पश्चिम घाटातील घनदाट जंगलांमध्ये प्रामुख्याने आढळणार्‍या केशराज कोतवाल या दुर्मिळ पक्ष्याची वर्धा जिल्ह्यात प्रथमच नोंद झाली आहे. वन संशोधन केंद्र, वर्धा परिसरातील पाणवठ्यावर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांनी या पक्ष्याचे निरीक्षण केले. जिल्ह्यातील पक्षीविविधतेच्या दृष्टीने ही नोंद महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
 
 
rare-keshraj-kotwal
 
केशराज कोतवाल हा कोतवाल कुळातील आकर्षक पक्षी आहे. त्याच्या काळ्या शरीरावर निळसर-हिरवी धातूसदृश झळाळी दिसते. डोयावर केसांसारखी बारीक पिसे आणि वैशिष्ट्यपूर्ण शेपटी ही त्याच्या ओळखीची प्रमुख वैशिष्ट्ये आहे. सामान्य कोतवाल अर्थात ब्लॅक ड्रोंगो पेक्षा हा पक्षी आकाराने मोठा व अधिक भारदस्त दिसतो. महाराष्ट्रात केशराज कोतवाल प्रामुख्याने पश्चिम घाट आणि कोकणातील जंगलांशी संबंधित आहे. स्टेट ऑफ इंडिया बर्ड नुसार महाराष्ट्रात या प्रजातीची नोंद स्थानिक तसेच हिवाळी स्थलांतरित म्हणून झाली आहे. त्याचा अधिवास प्रामुख्याने घनदाट जंगल व वृक्ष अच्छादित क्षेत्राशी संबंधित आहे.
 
 
विदर्भात केशराज कोतवालाची उपस्थिती तुलनेने दुर्मिळ आहे. उपलब्ध पक्षीनिरीक्षण नोंदींनुसार भंडारा जिल्ह्यातील वनक्षेत्रात तसेच नागपूर जिल्ह्यातील वाठोडा परिसरात या पक्ष्याचे दुर्मिळ दर्शन नोंदवले गेले आहे. त्यानंतर आता वर्धा जिल्ह्यात झालेली ही पहिली नोंद विदर्भातील या पक्ष्याच्या वितरणाच्या अभ्यासात महत्त्वाची भर घालणारी ठरली आहे.
 
वर्धेत आता कोतवालांच्या पाच प्रजाती
केशराज कोतवालाच्या नव्या नोंदीमुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या कोतवाल कुळातील प्रजातींची संख्या आता पाच झाली आहे. यात कोतवाल, राखी कोतवाल, पांढर्‍या पोटाचा कोतवाल, भृंगराज कोतवाल व केशराज कोतवाल यांचा समावेश आहे.
 
२७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता वर्धा जिल्ह्यात प्रथमच केशराज कोतवालाची नोंद करता आली आहे. नागपूर व भंडार्‍यानंतर वर्धेत झालेली ही नोंद जिल्ह्याच्या समृद्ध जैवविविधतेची पुन्हा एकदा साक्ष देते. वर्धेत आता कोतवालांच्या पाच प्रजातींची नोंद झाली असल्याची प्रतिक्रिया वन संशोधन केंद्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांनी दिली.