वायएसपीचा डिलिमिटेशन व महिला आरक्षणाला पाठिंबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
अमरावती,
ravi-rana-ysp-women-reservation-supportलोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या प्रस्तावाला आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीने (वायएसपी) जाहीर व ठाम पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या मुख्य कार्यालयात आज आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते ठराव पारित करून केंद्र सरकारच्या या पुढाकाराचे स्वागत करण्यात आले.
 

mahila  
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत पक्षाने महिला आरक्षणाच्या निर्णयाला ऐतिहासिक संबोधले. या आरक्षणामुळे राजकीय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढेल, महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल आणि लोकशाही व्यवस्थेत सर्वसमावेशक प्रतिनिधित्व अधिक मजबूत होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.
लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करून विद्यमान ५४३ सदस्यसंख्या प्रस्तावित ८१५ पर्यंत वाढविण्याच्या भूमिकेलाही पक्षाने समर्थन दिले. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधींची संख्या वाढल्यास ग्रामीण, शहरी, आदिवासी, दुर्गम आणि विकासापासून वंचित भागांना संसदेत अधिक प्रभावी आवाज मिळेल, असे पक्षाचे मत आहे. पुनर्रचना प्रक्रियेत सर्व राज्यांचे घटनात्मक हित, प्रादेशिक समतोल, लोकसंख्येचे प्रमाण आणि संघराज्यीय व्यवस्थेतील न्याय्य प्रतिनिधित्व जपण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. महिला, युवक आणि सर्व समाजघटकांना समान संधी व प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे पक्षाने स्पष्ट केले.
बैठकीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली. यावेळी जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, अॅड. नंदेश अंबाडकर, गणेशदास गायकवाड, सुनील राणा, संजय मुनोत, प्रकाश साबळे, सोनाली नवले, नितीन बोरेकर, पंकज उर्फ राजा बांगडे यांच्यासह कोअर कमिटीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.