ट्रायनच्या वादळी खेळीने रेनेगेड्स अंतिम फेरीत

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
मेलबर्न,
renegades-reach-the-final महिला बिग बॅश लीगच्या (WBBL) अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी मेलबर्न रेनेगेड्सला विजयाची गरज असताना दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू क्लोई ट्रायन संघासाठी संकटमोचक ठरली. अवघ्या १७ चेंडूंमध्ये नाबाद ५६ धावांची खेळी करत तिने संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. २८ नोव्हेंबर रोजी मेलबर्न स्टार्सविरुद्ध झालेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे प्रभावित सामन्यात डकवर्थ-लुईस (DLS) पद्धतीनुसार रेनेगेड्सने पाच गडी राखून विजय मिळवला. ट्रायनने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार लगावले. तिचे अर्धशतक डब्ल्यूबीबीएलच्या इतिहासातील संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.

renegades-reach-the-final
पावसामुळे सामना आठ षटकांचा करण्यात आला आणि रेनेगेड्ससमोर १०० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, धावांचा पाठलाग करताना संघाची अवस्था बिकट झाली. अवघ्या २९ धावांवर चार प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. अशा परिस्थितीत ट्रायनने आक्रमक फलंदाजीची जबाबदारी स्वीकारत सामन्याचे चित्रच बदलले. रेनेगेड्सने ७.५ षटकांत पाच गडी गमावून १०३ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी फलंदाजी करताना मेलबर्न स्टार्सने दमदार सुरुवात केली होती. मेग लॅनिंगने नाबाद ३८, तर एमी जोन्सने नाबाद ३४ धावा केल्या. पावसामुळे दोनदा खेळ थांबवावा लागला. त्यावेळी स्टार्सने ८.५ षटकांत बिनबाद ७५ धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या परिस्थितीनुसार रेनेगेड्सला १०० धावांचे लक्ष्य देण्यात आले.
ट्रायनने किम गार्थच्या पाचव्या षटकात २९ धावा वसूल करत विजयाच्या दिशेने कूच केली. या षटकात तिने एक षटकार आणि चार चौकार मारले. गार्थने चार वाईड आणि एक नो-बॉल टाकल्याने रेनेगेड्सला मोठा फायदा झाला. त्यानंतर चार्ली डीनच्या षटकात सलग दोन षटकार ठोकत ट्रायनने संघाच्या विजयाच्या आशा वाढवल्या. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असताना सोफी डेच्या गोलंदाजीवर दोन चौकार आणि एक षटकार मारून तिने विजय निश्चित केला. या विजयामुळे गतविजेत्या मेलबर्न रेनेगेड्सने महिला बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात धडक मारली.