अनिल कांबळे
नागपूर,
vidhan bhavan उपराजधानीत ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे. अधिवेशनादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस दलासह राज्याच्या विविध भागांतून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. एकूण ८ हजारांवर पोलिस अधिकारी आणि अंमलदारांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विधानभवन परिसरासह मोर्चे, धरणे आंदोलनाची ठिकाणे आणि संवेदनशील भागांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली.
हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यावर आहे. स्थानिक पोलिस दलातील २६९ अधिकारी आणि बाहेरून बोलाविण्यात आलेले ३५० अधिकारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळतील. याशिवाय १ हजार ९०० होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. संवेदनशील ठिकाणी निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या तैनात राहतील. तसेच बॉम्बशोधक पथके, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) आणि अन्य विशेष पथकेही सज्ज ठेवण्यात येणार आहेत.
‘वज्र’, ‘वरुण’ वाहने सज्ज
मोर्चे आणि आंदोलनांदरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच संभाव्य तणावाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ‘वज्र’ आणि ‘वरुण’ ही आधुनिक दंगल नियंत्रण वाहने तैनात करण्यात येणार आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी विशेष पथकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एआयच्या मदतीने संशयितांवर नजर
अधिवेशनाच्या काळात सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. विधानभवन परिसर, मोर्चे व धरणे आंदोलनांची ठिकाणे आणि पोलिस नियंत्रण कक्ष येथे विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तातडीने तपासणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिवेशनाच्या काळात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनासोबतच गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त राहुल मदने आणि वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.