भोपाल
shivraj singh chouhan केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या विमान प्रवासादरम्यान सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी ते भोपाळ विमानतळावरून इंडिगोच्या 6E-6259 या विमानाने प्रवास करीत होते. मात्र, विमान क्रमांक तोच असतानाही प्रत्यक्ष विमान आणि आसन बदलण्यात आल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाला तसेच संबंधित सुरक्षा व प्रोटोकॉल अधिकाऱ्यांना वेळेत देण्यात आली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय विमानतळावर प्रोटोकॉल कर्मचारी उपस्थित नसल्याने स्वागत व्यवस्था आणि सामानाच्या व्यवस्थापनातही अडचणी निर्माण झाल्याचा आरोप आहे.

या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत केंद्रीय मंत्री चौहान यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) भूपेंद्रसिंह परस्ते यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे लेखी तक्रार केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित निष्काळजीपणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
तक्रारीनुसार, विमानतळावर सुरक्षा तपासणी आणि विमानात प्रवेशाच्या प्रक्रियेदरम्यान केंद्रीय मंत्र्यांसोबत असलेल्या सहप्रवाशांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे अनावश्यक विलंब झाला आणि गैरसोयीला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे, तर अन्य प्रवासी विमानात बसण्यापूर्वीच शिवराजसिंह चौहान यांना एअरोब्रिजच्या दिशेने नेण्यात आले. मात्र, त्या वेळी एअरोब्रिजवर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने त्यांना मध्येच थांबावे लागले. ही बाब निर्धारित सुरक्षा आणि बोर्डिंग प्रक्रियेशी विसंगत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भोपाळ विमानतळावर पोहोचल्यानंतर संबंधित एटीएम सिद्धार्थ यादव तसेच प्रोटोकॉल कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागताची आणि सामान व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडताना अडचणी आल्या. विशेष म्हणजे, चौहान यांच्या निवासस्थानातून रवाना होण्यापूर्वीच त्यांच्या प्रवासाची माहिती सीआयएसएफचे संपर्क अधिकारी (लायझन ऑफिसर), विमानतळ प्रशासन, इंडिगोचे अधिकारी आणि प्रोटोकॉल कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. तरीही आवश्यक समन्वय आणि व्यवस्था करण्यात अपयश आल्याचा ठपका तक्रारीत ठेवण्यात आला आहे.
ओएसडी भूपेंद्रसिंह परस्ते यांनी मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात या घटनांची सविस्तर माहिती दिली आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान क्रमांकात बदल नसतानाही विमान आणि आसन बदलण्यात आले. मात्र, या बदलाची पूर्वसूचना संबंधित यंत्रणांना मिळाली नाही. परिणामी, विमानतळावरील स्वागत, सुरक्षा समन्वय आणि सामान व्यवस्थापनात गोंधळ निर्माण झाला. प्रवासाची पूर्वकल्पना संबंधित सर्व यंत्रणांना देऊनही अशा प्रकारच्या त्रुटी राहणे ही संबंधित अधिकाऱ्यांची गंभीर निष्काळजी असल्याचे परस्ते यांनी पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणावर अद्याप भोपाळ विमानतळ प्रशासन, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि इंडिगो विमान कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे तक्रारीतील आरोपांबाबत संबंधित यंत्रणांची भूमिका स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, यापूर्वी मार्च २०२६ मध्ये बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सुरक्षेतील त्रुटीचाही प्रकार समोर आला होता. त्यांच्या हेलिपॅड परिसरात एक मोकाट बैल शिरल्याने गोंधळ निर्माण झाला होता. बैलाला परिसरातून हुसकावून लावताना पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती. आता केंद्रीय मंत्र्यांच्या विमान प्रवासादरम्यान सुरक्षाव्यवस्था आणि प्रोटोकॉलमधील कथित त्रुटी समोर आल्याने महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी असलेल्या यंत्रणांमधील समन्वयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.