वरोडा,
son-murders-his-own-father तालुक्यातील खेमजई येथील प्रकरणात वडिलांच्या मृत्यूमागील कारणाचा उलगडा झाला. 3 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. सुरुवातीला वृद्ध वडील बाथरूममध्ये पडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली.
3 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास खेमजई येथील बाबा कवडू जीवतोडे (77) हे घरात स्वयंपाक करीत असताना त्यांचा मुलगा सूर्यभान बाबा जीवतोडे (35) हा बाहेरून दारू पिऊन घरी आला. स्वयंपाक आणि घरातील काम का केले नाही यावरून वडिलांनी सूर्यभानला जाब विचारणा केली व शिवीगाळ केली. तसेच गालावर थपडा मारल्या. याचा राग आल्याने सूर्यभानने वडिलांना ढकलून दिले, ज्यामुळे ते दरवाज्याजवळ कोसळले. त्यानंतर संतापाच्या भरात सूर्यभान स्वयंपाकघरात गेला आणि तेथील दगडी पाटा आणून वडिलांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात बाबा जीवतोडे बेशुद्ध पडले आणि त्यांच्या कानातून रक्तस्राव सुरू झाला. घटनेनंतर सूर्यभानने जखमी वडिलांना उपचारासाठी चारचाकी गाडी बोलावून मित्रांच्या मदतीने वरोडा येथील सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. 3 नोव्हेंबर रोजी त्यांना मृत घोषित करण्यात आले.
सुरुवातीला बाथरूममध्ये डोक्यावर पडल्याने मार लागून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, 4 नोव्हेंबर रोजी शवविच्छेदन केले गेले आणि 20 नोव्हेंबर रोजी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण ‘डोक्याला झालेली प्राणघातक मारहाण’ असे नमूद करण्यात आले. तपासादरम्यान मृतकाची पत्नी शोभा आणि मुलगी प्रियंका यांनी सूर्यभानला दारूचे व्यसन असून, दोघांमध्ये नेहमी वाद व मारामारी होत असल्याचे सांगितले. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या सूर्यभान याने विचारपूस दरम्यान संपूर्ण प्रकाराची कबुली दिली. अखेर शेगाव (बु.) पोलिसांनी आरोपी सूर्यभान जीवतोडे याच्याविरुद्ध कलम 103 (1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.