कारंजा लाड,
soybean-prices-fall-by-rs-300-in-a-week येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. आठवडाभरापूर्वी ७ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी थेट ७ हजार ६५० रुपयांवर आले. अवघ्या आठवडाभरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांची घसरण झाल्याने शेतकर्यांना आर्थिक फटका बसत आहे. विशेष म्हणजे बिजवाई सोयाबीनच्या दरात तर तब्बल ५०० रुपयांची घट झाली आहे.

यंदाच्या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच शेतकर्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामातील उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला असून, उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षित भाव मिळविण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत बाजारातील दरात चढ-उतार होत असल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. कारंजा बाजार समितीत आठवडाभरापूर्वी सोयाबीनला ७ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत होता. त्यामुळे दर आणखी वाढतील, या अपेक्षेने अनेक शेतकर्यांनी सोयाबीनची विक्री थांबवून ठेवली होती. मात्र, शुक्रवारी दरात ३०० रुपयांची घसरण होऊन भाव ७ हजार ६५० रुपयांवर स्थिरावल्याने शेतकर्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. बाजारातील या घसरणीमुळे शेतकर्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, शुक्रवारी कारंजा बाजार समितीत सोयाबीनची सुमारे ५ हजार ५०० क्विंटल आवक झाली. मोठ्या प्रमाणात आवक होत असतानाच दरात घसरण झाल्याने बाजारातील परिस्थितीकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. सध्या सोयाबीन विक्रीसाठी आणावे की भाव वाढण्याची प्रतीक्षा करावी, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे. एकीकडे शेतीसाठी लागणारा वाढता खर्च, दुसरीकडे उत्पादनातील घट आणि आता बाजारभावातील घसरण, अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकर्यांची आर्थिक कोंडी अधिकच तीव्र होत आहे. बाजारातील दरातील घसरणीमागील कारणे काय, याकडेही शेतकर्यांचे लक्ष असून, आगामी काळात सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा होणार का, याबाबत अनिश्चितता कायम आहे.
विक्री करावी की दरवाढीची प्रतीक्षा, शेतकरी संभ्रमात
सोयाबीन दरात ३०० रुपयांची घसरण होऊन भाव ७ हजार ६५० रुपयांवर स्थिरावल्याने शेतकर्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. तर आठवडाभरापूर्वी ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत असलेले बिजवाई सोयाबीनचे दर शुक्रवारी ८ हजार रुपयावर आल्याने शेतजर्यांची चिंता वाढली. शिवाय सध्या सोयाबीन विक्रीसाठी आणावे की भाव वाढण्याची प्रतीक्षा करावी, असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा ठाकला आहे.