औपचारिकता तेवढी शिल्लक...

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
दिल्ली अग्रलेख

session of parliament संसदेचे विशेष अधिवेशन केव्हा बोलावले जाणार, याबाबतची जनमानसातील उत्सुकता वाढली होती. अखेर सरकारने अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभा तसेच राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडे तशी औपचारिक विनंती गुरुवारी केली. संपूर्ण देश २६ नोव्हेंबरला संविधान गौरव दिवस साजरा करत असताना सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेत संविधानावरील आपली श्रद्धा आणि निष्ठा प्रकट केली, असे म्हणता येईल.

 
 
session of parliament
 
 
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेऊन सरकारने संविधान धाब्यावर बसवत असल्याच्या काँग्रेसच्या आरोपांना खणखणीत प्रत्युतर दिले आहे. लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर तर राज्यसभेचे अधिवेशन २ डिसेंबर आणि ३ डिसेंबरला बोलावण्याचा निर्णय झाला आहे. आता फक्त दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना तसा औपचारिक निर्णय घ्यावा लागणार आहे. सरकारने या विशेष अधिवेशनाचा अजेंडा सांगितला नसला तरी महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी हे अधिवेशन बोलावण्यात आले आहे, हे स्पष्टच आहे. या दोन्ही विधेयकांमागील सरकारची भूमिका देशाच्या व्यापक लोकशाही हिताची आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला तर लोकसभा आणि राज्य विधानसभांमधील महिलांचे प्रतिनिधित्व लक्षणीयरीत्या वाढणार आहे. त्यासाठी लोकसभा आणि राज्य विधानसभांमधील सदस्यसंख्येत ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याची तरतूद त्यात आहे. या कमाल संख्येच्या एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव झाल्यास महिला खासदारांची संख्या २८३ च्या पुढे जाऊ शकते. म्हणजेच, भारतीय लोकशाहीच्या निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग केवळ प्रतीकात्मक न राहता प्रत्यक्ष आणि प्रभावी होण्याची संधी निर्माण होऊ शकते. या अर्थाने महिला आरक्षणाचा प्रस्ताव हा महिलांना राजकीय समानता आणि नेतृत्वाची संधी देणारा महत्त्वपूर्ण घटनात्मक बदल ठरू शकतो.
संसदेचे पावसाळी अधिवेशन दोन्ही सभागृहांतील प्रचंड गदारोळामुळे १३ ऑगस्टला अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा जुना विक्रमही मोडला गेला. याआधी एकदा ८७ दिवसांसाठी अधिवेशन स्थगित करावे लागले होते. यावेळी तर शंभर दिवसांच्या वर कालावधी झाला आहे. सामान्यपणे संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रपती भवनातर्फे अधिवेशन संस्थगित झाल्याची अधिसूचना जारी केली जाते. यावेळी सरकारच्या मनात विशेष अधिवेशन बोलावण्याचे आणि त्यात महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक पारित करायचे असल्याने पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची अधिसूचना निघाली नव्हती. आधीचे अधिवेशन संस्थगित झाल्याची अधिसूचना निघत नाही, तोपर्यंत नवीन अधिवेशन बोलावता येत नाही. त्यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशनही बोलावता येत नव्हते. पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची अधिसूचना राष्ट्रपती भवनाने जारी केल्यानंतर किमान १४ दिवसांच्या अंतराने दुसरे अधिवेशन बोलावता येते. यावेळी पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची अधिसूचना न निघाल्यामुळे हिवाळी अधिवेशनही बोलावता येत नव्हते. सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतल्यामुळे हिवाळी अधिवेशन बोलावण्याचा मार्ग प्रशस्त झाला, असे म्हणायला हरकत नाही.
सामान्यपणे संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते आणि डिसेंबर महिन्यात ख्रिसमसपूर्वी संपते. पण यावेळी नोव्हेंबर महिना संपत आला तरी हिवाळी अधिवेशन सुरू झालेले नाही. त्यामुळे चर्चा होणे स्वाभाविक होते. तशी झाली आणि होत आहे. महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोनतृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. याआधी मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात झालेल्या विशेष अधिवेशनात दोन्ही विधेयके दोनतृतीयांश बहुमताअभावी फेटाळली गेली होती. यावेळी विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोनतृतीयांश बहुमताची जुळवाजुळव सरकारने केली आहे, असे मानायला जागा आहे. तसे नसते, तर सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेतलाच नसता. मागील अनुभवामुळे सरकार या दोन्ही घटनादुरुस्ती विधेयकांच्या मुद्यावर प्रत्येक पाऊल फुंकून टाकत आहे.
गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश या पाच राज्यांत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका व्हायच्या असताना सरकारने ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित करून घेण्याचा विडा उचलला आहे, हे महत्त्वाचे. या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे या दोन्ही घटनादुरुस्ती विधेयकांना विरोध करणे काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना परवडणारे नाही. काँग्रेस पक्ष महिलाविरोधी असल्याचा संदेश यातून जाऊ शकतो.session of parliament त्यामुळे सरकारने योग्य वेळी ही घटनादुरुस्ती विधेयके मांडण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना खिंडीत गाठले आहे, असेही म्हणता येईल. काँग्रेसच्या नेतृत्वातील विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव इंडिया असताना या दोन्ही घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून विरोधी पक्ष इंडिया म्हणजे भारतविरोधी भूमिका घेणार का, याकडे जनमानसाचे लक्ष राहणार आहे.
२०२५ च्या एप्रिल महिन्यात ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके फेटाळली गेली, तेव्हाच्या आणि आताच्या राजकीय परिस्थितीत जमीन अस्मानचा फरक आहे. त्यावेळी सत्ताधारी पक्षाकडून ‌‘फ्लोअर मॅनजमेंट‌’बाबत ज्या चुका झाल्या, त्यांची दुरुस्ती सत्ताधारी भाजपाने यावेळी केली. रालोआ आघाडीतील मित्रपक्षांची संख्या वाढवली आहे. दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्याएवढे संख्याबळ आपल्याजवळ नसते, तर सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची हिंमत केली नसती, हे उघड आहे.
लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ आहे. यातील ३ जागा रिक्त आहेत. ५४० सदस्यांच्या सभागृहात सरकारला ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी दोनतृतीयांश म्हणजे ३६० सदस्यांची आवश्यकता आहे. रालोआजवळ सध्या ३२२ खासदार आहेत. म्हणजे रालोआला आणखी ३८ खासदारांची गरज आहे. इंडिया आघाडीजवळ १८३ खासदार आहेत, दोन्ही आघाड्यांत नसलेल्या खासदारांची संख्या ३५ आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडत २० खासदार बाहेर पडले. ते भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. नव्हे, त्यांचा पाठिंबा हा पक्का आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही या मुद्यावर सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर या मुद्यावर २८ खासदारांची भर रालोआच्या बाजूने पडणार आहे. द्रमुकने या विधेयकाला पाठिंबा दिला तर सरकारची डोकेदुखीच संपते. ही दोन्ही घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी विरोधी पक्षांनी किंवा कोणत्याही सदस्याने विधेयकाला थेट व स्पष्ट पाठिंबाच दिला पाहिजे, असेही नाही. सभागृहात अनुपस्थित राहूनही काही लोक ही दोन्ही विधेयके पारित करण्याचा सरकारचा मार्ग प्रशस्त करू शकतात. कारण दोनतृतीयांश बहुमत हे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या नव्हे तर सभागृहात उपस्थित असलेल्या सदस्यसंख्येच्या प्रमाणात असते. मतदानाच्यावेळी सभागृहात जेवढे खासदार उपस्थित असतील, त्यापैकी दोनतृतीयांश बहुमत विधेयक पारित होण्यासाठी आवश्यक असते. काही विरोधी पक्षांना या दोन्ही विधेयकांना प्रत्यक्ष पाठिंबा देणे राजकीयदृष्ट्या शक्य नसेल तर ते मतदानाच्यावेळी सभागृहात अनुपस्थित राहून सरकारला मदत करू शकतात. एकंदरीत सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या परिसीमनाबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक पारित होणे ही आता फक्त औपचारिकता उरली आहे. या विधेयकामुळे महिलांच्या उज्ज्वल राजकीय भविष्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे, देशात एका नव्या युगाचा प्रारंभ होणार आहे. त्या युगाचे स्वागत करण्याचा दिवस जवळ आला आहे.