अनिल कांबळे
नागपूर,
tarzan murdered दारूच्या वादातून एका भंगार गोळा करणाऱ्या टारझन या व्यक्तीला चार मित्रांनी बेदम मारहाण केली. डोक्यावर काठीचा घाव घालून बेशुद्ध पाडले आणि नंतर त्याला पोत्यात भरून नाल्यात फेकून दिले. ‘टारझन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या व्यक्तीच्या मृत्यूचे गूढ उकलताच गणेशपेठ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. अन्य दोघे अद्याप फरार आहेत.
२४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजताच्या सुमारास लोहापुलाजवळ, मेट्रो पुलाखालील कबाडी दुकानासमोर नाल्याच्या पाण्यात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. अग्निशमन दलाच्या मदतीने त्याला बाहेर काढून मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाच्या या व्यक्तीची ओळख सुरुवातीला पटली नव्हती. भंगार गोळा करून विकणाऱ्या या व्यक्तीला परिसरात ‘टारझन’ म्हणून ओळखले जात होते. अकस्मात मृत्यूच्या नोंदीवरून सुरू झालेल्या चौकशीत मृत्यूमागील हिंसक घटनांचा उलगडा झाला. टारझन हा मोहम्मद इस्लाम ईशीहार अहमद (४२), शशीकांत प्रभाकर जामठावार (३८), किशोर आणि धर्मा या चौघांसोबत दारू पिण्यासाठी नाल्याच्या काठावर गेला होता. दारू पिण्यावरून त्यांच्यात वाद झाला. टारझनने शिवीगाळ केल्याने चौघांनी त्याला मारहाण केली.tarzan murdered त्यात धर्मा याने डोक्यावर लाकडी काठीने प्रहार केला. टारझन बेशुद्ध पडताच आरोपींनी त्याला पोत्यात भरून नाल्यात फेकून दिले.
अब्दुल सईद अब्दुल हफीज यांच्या सूचनेवरून दाखल झालेल्या अकस्मात मृत्यूच्या तपासाने आता हत्येचे स्वरूप घेतले आहे. गणेशपेठ पोलिसांनी मोहम्मद इस्लाम आणि शशीकांत जामठावार यांना अटक केली असून, किशोर व धर्मा यांचा शोध सुरू आहे. एका किरकोळ वादातून सुरू झालेली मारहाण अखेर जीवघेण्या हत्येत संपली.