पाण्याअभावी संत्राबागा सुकण्याच्या मार्गांवर

दुष्काळाची तीव्रता वाढली

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
कारंजा लाड,
the-severity-of-the-drought-has-increased निसर्गाच्या लहरीपणाचा आणि पावसाच्या लांबलेल्या खंडाचा फटका आता शेतकर्‍यांच्या फळबागांना बसू लागला आहे. खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीनंतर आता रब्बी हंगामावरही दुष्काळाचे सावट गडद झाले असून, पाण्याअभावी कारंजा तालुयात संत्र्यांच्या बागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी संत्र्यांच्या झाडांना आवश्यक पाणी मिळत नसल्याने झाडांची पानगळ सुरू झाली आहे, तर काही बागांमधील फळांची वाढ खुंटण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे मेहनत, भांडवल आणि घाम गाळून उभ्या केलेल्या फळबागा डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र पाहून शेतकरी हतबल झाले आहेत.
 
 
the-severity-of-the-drought-has-increased
 
कारंजा तालुयासह परिसरातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा संपुष्टात आला आहे. त्यातच विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी कमालीची खालावली असून, अनेक विहिरींचे पाणी तळाला गेले आहे. कूपनलिकामधूनही पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांची मोठी कोंडी झाली आहे. उपलब्ध असलेले थोडेफार पाणी पिकांना द्यायचे की संत्राबागा वाचविण्यासाठी वापरायचे, असा गंभीर प्रश्न शेतकर्‍यासमोर उभा ठाकला आहे.
 
 
संत्र्यांची बाग उभी करणे म्हणजे अनेक वर्षांची मेहनत आणि मोठी आर्थिक गुंतवणूक. रोपांची लागवड, खते, औषधांची फवारणी, मजुरी, पाणी व्यवस्थापन यावर शेतकरी दरवर्षी मोठा खर्च करतात. मात्र, आता पाण्याअभावी हीच झाडे सुकू लागल्याने शेतकर्‍यांच्या गुंतवणुकीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. संत्राबागांना वेळेवर पाणी न मिळाल्यास झाडांची वाढ, फळधारणा आणि आगामी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शयता आहे. यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे खरीप हंगामातही शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित आधीच कोलमडले आहे. त्यात आता रब्बी पिकांसाठी पाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतजमिनी पडीक ठेवण्याची वेळ येत आहे.
 
 
संत्राबागा आणि इतर फळपिकांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे, उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेणे, सिंचनासाठी व्यवहार्य पर्याय उपलब्ध करून देणे तसेच नुकसानग्रस्त बागांचे पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे. एकीकडे पावसाने पाठ फिरविली, दुसरीकडे विहिरी-कूपनलिका आटल्या आणि धरणातील पाण्याच्या वापरावर निर्बंध आले. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी आपल्या फळबागा जगवायच्या तरी कशा? वर्षानुवर्षे जपलेली संत्राबाग डोळ्यांदेखत सुकताना पाहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. दुष्काळाची झळ आता केवळ पिकांपुरती मर्यादित राहिली नसून शेतकर्‍यांच्या आर्थिक अस्तित्वावरच घाला घालत आहे.