पौरी गढवाल,
tragedy-in-uttarakhand उत्तराखंडमध्ये भीषण रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, पौरी गढवाल जिल्ह्यातील रिखनीखाल परिसरात एक वाहन खोल दरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिखनीखालमधील कलवाडीजवळ हा अपघात घडला. वाहन भांगलवाड गावाच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट दरीत कोसळली. या दुर्घटनेत सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
या दुर्घटनेबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच गंभीर जखमींना उत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हवाई मार्गाने हलवण्याची व्यवस्था करण्यासही सांगितले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करत त्यांनी जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तराखंडमधील टिहरी गढवाल येथे काही दिवसांपूर्वीच गुलार पुलाजवळ प्रवासी बस दरीत कोसळली होती. हरिद्वारहून चमोली, जोशीमठ आणि बद्रीनाथच्या दिशेने जाणारी ही बस सुमारे १०० मीटर खोल दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २५ ते २६ प्रवासी जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पौरी गढवालमध्ये झालेल्या अपघातामुळे उत्तराखंडमधील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.