३० आयपीएस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांत मोठे फेरबदल

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
लखनौ
up police
उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातील बदलांचे सत्र सुरूच आहे. राज्य सरकारने अवघ्या दोन दिवसांत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. शुक्रवारी २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखी दोन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. आग्रा विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) एस. के. भगत यांना पदावरून हटवून लखनौ येथील पोलीस मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रशांत कुमार यांची आग्रा विभागाच्या एडीजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



उत्तर प्रदेश शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, १९९८ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी एस. के. भगत यांच्याकडे आतापर्यंत आग्रा विभागाच्या एडीजीपदाची जबाबदारी होती. आता त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालक मुख्यालय, लखनौ येथे करण्यात आली आहे. तर २००० च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी प्रशांत कुमार यांच्याकडे आग्रा विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते यापूर्वी उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) म्हणून कार्यरत होते.

याआधी शुक्रवारी राज्य सरकारने पोलीस प्रशासनात व्यापक फेरबदल करत एकाच वेळी २८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या निर्णयात नोएडा आणि गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांपासून ते लखनौ व बरेली विभागांच्या एडीजींपर्यंत अनेक महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या. विविध परिक्षेत्रांतील पोलीस उपमहानिरीक्षकांच्याही नियुक्त्यांमध्ये फेरबदल करण्यात आले.

या बदल्यांनुसार, गाझियाबादचे पोलीस आयुक्त जे. रविंदर गौड यांची गौतम बुद्ध नगर अर्थात नोएडाच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर नोएडाच्या पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांना गाझियाबाद येथे पाठविण्यात आले आहे. लक्ष्मी सिंह गेल्या जवळपास चार वर्षांपासून गौतम बुद्ध नगर येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या.

प्रशासकीय फेरबदलात लखनौ विभागाचे एडीजी प्रवीण कुमार यांच्याकडे बरेली विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर बरेली विभागाचे एडीजी रमित शर्मा यांची लखनौ विभागाच्या एडीजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लखनौ परिक्षेत्राचे आयजी किरण एस. यांना वाराणसीचे पोलीस आयुक्त करण्यात आले असून, अलीगढ परिक्षेत्राचे डीआयजी प्रभाकर चौधरी यांची लखनौ परिक्षेत्रात बदली करण्यात आली आहे.

प्रयागराज आणि वाराणसी येथील पोलीस प्रशासनातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. प्रयागराजचे पोलीस आयुक्त पीयूष मोर्डिया यांची उत्तर प्रदेशच्या एडीजी (आस्थापना) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वाराणसीचे पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांची प्रयागराजच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या शहरांतील पोलीस व्यवस्थेची जबाबदारी नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच पोलीस प्रशासनाला अधिक गतिमान आणि प्रभावी बनविण्यासाठी हे फेरबदल करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीपूर्वी संवेदनशील भागांतील सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय समन्वय मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे या बदल्यांवरून दिसून येते. दरम्यान, येत्या काही दिवसांत पोलीस दलातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.