न्यायदानात एआयचा वापर, पण चुकांची जबाबदारीही निश्चित हवी!

-माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्ट भूमिका; -हायकोर्टात संविधान दिनानिमित्त विशेष चिंतन सत्र;

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
justice bhushan gavai न्यायदानाची प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे इंग्रजीतील निकाल सुमारे १७ भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जात आहेत. समान स्वरूपाच्या प्रकरणांचे वर्गीकरण करून त्यांचा एकत्रित निपटारा करण्यासाठीही तंत्रज्ञानाची मदत होत आहे. मात्र, एआयच्या चुकीच्या वापरामुळे न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच त्यातील त्रुटींची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.
 
 
न्यायदानात एआयचा वापर, पण चुकांची
 
 
संविधान दिनानिमित्त शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आयोजित विशेष चिंतन सत्रात ते बोलत होते. ‘तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रशासनाच्या युगात सत्तेचे पृथक्करण’ या विषयावर त्यांनी विचार मांडले. यावेळी उच्च न्यायालयाच्या परिसरात नवनिर्मित अॅम्फीथिएटरचे लोकार्पणही करण्यात आले. गवई म्हणाले, न्यायदानाची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यासाठी ई-कोर्ट प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एआयमुळे न्यायालयीन कामकाजाचा वेग वाढू शकतो. मात्र, त्याचा वापर करताना मानवी देखरेख, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
 
एआयच्या चुकीच्या वापराचे उदाहरण देताना त्यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाच्या (एनसीएलएटी) एका आदेशाचा उल्लेख केला. या आदेशात अशा न्यायालयीन प्रकरणांचे संदर्भ देण्यात आले होते, ज्यांचे प्रत्यक्षात अस्तित्वच नव्हते. त्यामुळे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. न्यायालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करताना अशा चुका टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे उपस्थित होते. याशिवाय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे माजी न्यायमूर्ती, वरिष्ठ अधिवक्ते, बार कौन्सिलचे सदस्य, विविध वकील संघटनांचे पदाधिकारी, मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासह विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदतीचे आवाहन
महाराष्ट्रातील पाणीटंचाई आणि शेतकरी आत्महत्यांच्या संभाव्य संकटाबाबत भूषण गवई यांनी चिंता व्यक्त केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बार असोसिएशनने दुष्काळ निवारण निधीत योगदान द्यावे, तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
‘मीडिया ट्रायल’ कायद्याच्या राज्याच्या विरोधात : न्यायमूर्ती चांदुरकर
माध्यमांमधून होणारी ‘मीडिया ट्रायल’ ही कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेच्या विरोधात असून, त्यामुळे निष्पक्ष सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, असे मत न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांनी व्यक्त केले. बातम्यांच्या स्पर्धेत माध्यमांनी अचूकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व जपावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पर्यावरणाची किंमत मोजून विकास नको : मुख्य न्यायमूर्ती त्रिपाठी
विकास आवश्यक असला, तरी त्यासाठी निसर्गाचा बळी देता कामा नये. एखाद्या विकास प्रकल्पाच्या खर्चात परिसरातील कुटुंबांवर होणारा वैद्यकीय खर्च आणि नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी लागणाऱ्या खर्चाचाही समावेश असावा, असे प्रतिपादन मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी केले.
दुष्काळग्रस्तांना २१ लाखांची मदत
नायलॉन मांजासंदर्भातील जनहित याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने ‘जनकल्याण निधी’ स्थापन केला आहे. मांजाची तस्करी आणि विविध प्रकरणांमध्ये आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम या निधीत जमा केली जाते. आतापर्यंत निधीत ९६ लाख रुपये जमा झाले असून, त्यापैकी २१ लाख रुपयांचा धनादेश दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.