wedding-muhurat-dates-2026तुळशी विवाह आटोपल्यानंतर आता विवाहसराईच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. लग्नाची तयारी करणाऱ्या वधू-वरांसह त्यांच्या पालकांकडून विवाहाच्या तारखांचे नियोजन सुरू झाले आहे. विवाहासाठी डिसेंबर महिन्यात सर्वाधिक 15, फेब्रुवारीमध्ये 14, तर मार्च महिन्यात 12 विवाह मुहूर्त आहेत. जानेवारी महिन्यातही काही आपत्कालीन आणि शुद्ध मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यामुळे सिंहस्थ वर्ष असल्याने विवाह मुहूर्त कमी मिळतील, अशी चिंता व्यक्त करणाऱ्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
यंदा सिंहस्थ वर्ष असल्याने गुरु सिंह राशीत असताना विवाहासह काही शुभकार्यांवर निर्बंध असल्याची चर्चा होती. याबाबत ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सिंहस्थ काळात गुरु सिंह राशीत असताना काही धार्मिक नियमांनुसार विवाह, वास्तुशांती यांसारखी शुभकार्ये वर्ज्य मानली जातात. मात्र, काही विशिष्ट भौगोलिक प्रदेशांमध्येच सिंहस्थाचे हे नियम लागू असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सर्वच ठिकाणी विवाह मुहूर्त उपलब्ध नसतील, असे नाही.
गुरूने 31 ऑक्टोबर 2026 रोजी सिंह राशीत प्रवेश केला असून, 24 जानेवारी 2027 च्या आसपास तो पुन्हा वक्री होण्याची स्थिती निर्माण होणार आहे. या कालावधीत काही ठिकाणी आपत्कालीन विवाह मुहूर्त पंचांगात देण्यात आले आहेत. विशेषतः नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील काही तारखा या आपत्कालीन मुहूर्त म्हणून सांगण्यात आल्या आहेत. त्यानंतर 24 जानेवारीपासून पुढे शुद्ध विवाह मुहूर्त उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विवाह इच्छुकांना पंचांग आणि स्थानिक परंपरांनुसार तारखांचे नियोजन करता येणार आहे.