भांडेवाडी डम्पिंग यार्डबाबत काय उपाययोजना केल्या?

-हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल -तीन आठवड्यांत अहवाल सादर करा : हायकोर्टाचे पर्यावरण विभागाला आदेश

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
bhandewadi dumping yard शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्याची समस्या आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता, या प्रकरणी नेमक्या काय उपाययोजना केल्या जात आहेत?, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी संबंधित प्राधिकरणांना दिले. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती रोहित जोशी यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
 
bhandewadi dumping yard
 
 
अनिल वडपल्लीवार आणि इतर तिघांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. भांडेवाडी येथील कचऱ्याचे अवैज्ञानिक पद्धतीने होणारे डम्पिंग आणि जाळणे तात्काळ थांबवून हे डम्पिंग यार्ड शहराच्या लगतच्या परिसराबाहेर स्थलांतरित करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, अ‍ॅड. मल्लिका गोयंका यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, भांडेवाडी परिसरात आता मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. तसेच, या डम्पिंग यार्डच्या अगदी शेजारी सिम्बायोसिस कॉलेज, एनआयएमएस आणि नुकतेच सुरू झालेले ३०० बेडचे रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यामुळे येथील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोर्टाला सांगितले की, भांडेवाडीतील कचरा साफ करण्याचे काम यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. यावर हायकोर्टाने एमपीसीबीच्या अध्यक्षांना कचऱ्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जात आहे, याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, पर्यावरण मंत्रालयाच्या सचिवांनाही या प्रकरणात उचललेल्या पावलांची माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणात मनपाने यापूर्वीच आपले उत्तर दाखल केले असून, त्यांना हवे असल्यास अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. हे सर्व अहवाल आणि प्रतिज्ञापत्रे तीन आठवड्यांत सादर करणे बंधनकारक असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या २१ डिसेंबर रोजी होणार असून हे प्रकरण सुनावणीसाठी प्राधान्यक्रमावर ठेवण्यात आले आहे.