महिला आरक्षणासाठी प्रत्येक अडथळा दूर करणार; मोदींचा निर्धार

    दिनांक :28-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
modis-resolve महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून या मार्गातील सर्व अडचणी दूर केल्या जातील, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करून महिला आरक्षणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. देशातील महिलांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
modis-resolve
 
आपल्या संदेशात मोदी म्हणाले की, महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिकाधिक संधी मिळावी, यासाठीचा प्रयत्न अनेक दशकांपासून सुरू आहे. आपणही अनेक वर्षांपासून या विषयावर काम करत आहोत. अनेक महिलांनी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रांच्या माध्यमातून महिला आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे. देशातील महिलांचा आशीर्वाद सरकारच्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीत येणारे सर्व अडथळे दूर करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
 
महिलांना संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळण्यापासून आरक्षणाला विरोध करणारे राजकीय पक्ष रोखू शकणार नाहीत, असेही मोदी यांनी म्हटले. सरकारचा आत्मविश्वास आणि निर्धार कायम असून यासाठी योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागेल, असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
 
दरम्यान, केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत मांडण्याची तयारी पूर्ण केली आहे. या विधेयकाच्या प्रती खासदारांना देण्यात आल्या असून, त्यांना त्यातील तरतुदींचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. विधेयकासंदर्भात काही प्रश्न किंवा आक्षेप असल्यास ते मांडण्याची तयारी करण्याच्या सूचनाही खासदारांना देण्यात आल्या आहेत. संसदेतील चर्चेदरम्यान उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सरकार तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
३० नोव्हेंबर रोजी लोकसभेत हे विधेयक सादर केले जाणार आहे. महिला आरक्षणाची अंमलबजावणी मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडलेली असल्याने या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आगामी संसदीय अधिवेशनात या विधेयकावर होणाऱ्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.