नागपूर,
agrovision-water-conservation-exhibitionविदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतीसमोरील पाण्याचे संकट लक्षात घेता, यंदाच्या अँग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात जलसंवर्धन हा विषय केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेली जलसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची माहितीपर चित्रप्रदर्शनी शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. हजारो शेतकरी या चित्रप्रदर्शनीला भेट देत असून, जलसंवर्धनाच्या विविध यशस्वी प्रयोगांची माहिती जाणून घेत आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन, पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविणे हाच शाश्वत मार्ग असल्याचा संदेश या प्रदर्शनातून दिला जात आहे.

अँग्रोव्हिजनच्या पहिल्याच दिवशी जलसंवर्धनाच्या महत्त्वावर विशेष जलपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याचे नियोजन, उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पातळीत वाढ आणि शेतीसाठी पाण्याची शाश्वत उपलब्धता या विषयांवर या परिषदेत विचारमंथन करण्यात आले. त्याच विचाराला पुढे नेत पूर्ती सिंचन समृद्धी संस्थेने आपल्या चित्रप्रदर्शनीत प्रत्यक्ष जलसंवर्धनाच्या कामांची छायाचित्रे, विविध पॅटर्न आणि त्यातून घडलेल्या परिवर्तनाच्या यशोगाथा मांडल्या आहेत. या चित्रप्रदर्शनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी भेट दिली. बिहारचे कृषीमंत्री विजयकुमार सिन्हा, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, अॅग्रोव्हिजनचे आयोजन सचिव रवी बोरटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था गेल्या अनेक वर्षांपासून जलसंवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असून, विदर्भातील जलसमस्यांवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप उपाय शोधण्याचे काम संस्थेने केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रेरणेतून आणि स्व. भय्यासाहेब मुंडले यांच्या सहकार्याने संस्थेची स्थापना झाली. नितीन गडकरी हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहिले असून माधव कोटस्थाने यांनी संस्थापक सचिव म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या चित्रप्रदर्शनीचे वैशिष्ट्य म्हणजे जलसंवर्धनाच्या विविध प्रयोगांची केवळ माहिती न देता, प्रत्यक्ष कामांचे स्वरूप, त्यामागील संकल्पना आणि त्यातून झालेला सकारात्मक बदल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. यामध्ये तामसवाडा पॅटर्न, बुलढाणा पॅटर्न, अमृत सरोवर पॅटर्न आणि वाशीम पॅटर्न यांची सविस्तर सचित्र माहिती देण्यात आली आहे. याशिवाय जनकल्याणकारी संस्थांचे योगदान, पाणी वापर संस्थांची भूमिका आणि लोकसहभागातून जलसंवर्धनाची कामे कशा प्रकारे यशस्वी होऊ शकतात, याचीही माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.
अँग्रोव्हिजनमध्ये ही चित्रप्रदर्शनी उभारण्यासाठी पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्लदत्त जामदार, सचिव माधव कोटस्थाने, राजेंद्र देशकर, मिलिंद भगत, सत्यजित जांभुळकर आणि निरंजन अत्रे यांनी पुढाकार घेतला. विविध जलसंवर्धन प्रकल्पांची माहिती संकलित करून ती शेतकऱ्यांना सहज समजेल अशा स्वरूपात छायाचित्रांसह मांडण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
तामसवाडा पॅटर्नमध्ये नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत मुरविण्यावर भर देण्यात आला आहे. बुलढाणा पॅटर्नमध्ये रस्ते विकासाच्या कामांमधून उपलब्ध होणाऱ्या मातीचा आणि दगडांचा उपयोग जलस्रोतांच्या खोलीकरणासाठी करून जलसाठवण क्षमता वाढविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. अमृत सरोवर पॅटर्नमध्ये गावांतील तलाव आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून पाणी साठविण्याच्या क्षमतेत वाढ करण्यावर भर आहे. तर वाशीम पॅटर्नच्या माध्यमातून स्थानिक परिस्थितीनुसार जलसंवर्धनाची कामे कशी राबविता येतात, याची माहिती देण्यात आली आहे. या सर्व प्रयोगांमधून एकच महत्त्वाचा विचार अधोरेखित होतो, तो म्हणजे जलसंवर्धनासाठी लोकसहभाग, नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यंत आवश्यक आहेत.