वॉशिंग्टन,
ai-risk-humanity-2030कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात् एआयमुळे २०३० पर्यंत मानवाची संपूर्ण जीवनशैली बदलणार आहे. २०२७ पर्यंत एआय मानवापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान होईल आणि प्रत्येक निर्णयात त्याचा हस्तक्षेप वाढेल. २०३० संपण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवजातीचा विनाश होण्याची किंवा मानवाचे नियंत्रण नष्ट होण्याची ५० टक्के शक्यता असल्याचा इशारा एआय सुरक्षा संशोधक निकोला जुर्कोविच यांनी दिला आहे. तंत्रज्ञानाचा धोका टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
निकोला एक्सवर ‘अ वॉर्निंग अबाउट एआय टू माय लव्हड वन्स’ या शीर्षकाखालील लेख शेअर केला आहे. त्यात म्हटले की, २०२७ पर्यंतच एआय मानवापेक्षा कितीतरी पटीने अधिक बुद्धिमान होऊ शकते. त्यामुळे या तंत्रज्ञानावरील मानवाचे नियंत्रण कायम राहील की नाही, याबाबत गंभीर चिंता निर्माण आहे. अत्याधुनिक एआय च्या विकासाचा वेग जाणीवपूर्वक आणि लक्षणीयरीत्या कमी केला नाही, तर २०३० संपण्यापूर्वी मानवजातीचे वर्चस्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राजकीय नेते आणि व्यावसायिकांनी अधिकाधिक निर्णयक्षमता एआयकडे सोपवल्यास प्रगत एआय प्रणालींना महत्त्वाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोच मिळू शकते, जैविक शस्त्रे तयार करण्यास मदत होऊ शकते किंवा निर्णयांवर प्रभाव पडू शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
धोके टाळण्यासाठी एआयची पुढील प्रगती रोखणारे जागतिक नियम तयार करावे लागेल. एआयमुळे आगामी काळात जागतिक रोजगार बाजारपेठेत मोठे बदल होऊ शकतात आणि पुढील एका दशकात सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नाहीशा होऊ शकतात. सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नाहीशा होतील आणि पुढील १० वर्षांत जगातील बहुसंख्य लोक बेरोजगार होतील, असे त्यांनी नमूद केले आहे.
आपत्तींसाठी तयारी करावी
एआयचे धोके लक्षात घेता जागतिक आपत्तींसाठी तयारी करायला हवी. परिस्थिती चांगली नाही, पण ती सुधारण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. प्रयत्न आणि समन्वयाच्या जोरावर, आपण एक प्रजाती म्हणून या संकटातून सुखरूप बाहेर पडू शकतो, असा विश्वासही निकोला यांनी व्यक्त केला आहे.
एआय क्षेत्रातील मान्यवरांचेही इशारे
गूगलचे माजी उपाध्यक्ष जेफ्री हिंटन यांनी म्हटले की, पुढील एका दशकात एआयमुळे सर्व मानवांचा मृत्यू होण्याची १० टक्के शक्यता आहे. ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय देखरेख यंत्रणेची मागणी करणाऱ्या सुमारे ४०० शास्त्रज्ञांमध्ये त्यांचा समावेश होता. अँथ्रॉपिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी डारिओ अमोदेई यांनीही एआयमुळे नागरी व्यवस्थेच्या पातळीवर मोठी आपत्ती येण्याची १० ते २५ टक्के शक्यता वर्तवली आहे.