सोलापूर,
food poisoning शहरातील हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या नाश्त्यातील पोहे खाल्ल्यानंतर ११ विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होटगी रोड परिसरातील पंडित दीनदयाल आणि राणी लक्ष्मीबाई या दोन वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे हॉस्टेल परिसरात खळबळ उडाली असून, सर्व विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी सकाळी नाश्त्यासाठी पोहे खाल्ले होते. त्यानंतर नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत गेले. मात्र, शाळेत पोहोचल्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. एकामागून एक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडू लागल्याने हॉस्टेल प्रशासनाची धावपळ उडाली.
या घटनेत दोन्ही वसतिगृहांतील एकूण ११ विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे समोर आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
सकाळच्या नाश्त्यात पोहे खाल्ल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.food poisoning मात्र, विद्यार्थ्यांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नाश्त्यातील अन्नाचे नमुने तपासल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हॉस्टेलमधील भोजन व्यवस्थेची तपासणी करण्याची गरजही या घटनेतून अधोरेखित झाली आहे.