बुलढाणा,
gulbheli sarpanch vishwambhar मोताळा तालुयातील गुळभेली ग्रामपंचायतीचे सरपंच विश्वंभर नामदेव दळवी यांना अपर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आवश्यक ग्रामसभा न घेतल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम (७) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. हा आदेश १८ नोव्हेंबर २०२६ रोजी पारित करण्यात आला. गुळभेली ता. मोताळा येथील रहिवासी मनोहर नारायण शिंदे यांनी सरपंच विश्वंभर दळवी यांच्या विरोधात अपर जिल्हाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सरपंचांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आवश्यक ग्रामसभा घेतल्या नसून, त्यामुळे गावकर्यांना समस्या मांडण्याची व शासकीय योजनांचा लाभ घेण्याची संधी मिळाली नसल्याचा दावा अर्जात करण्यात आला होता. २४ सप्टेंबर रोजी सादर झालेल्या अहवालानुसार, ग्रामपंचायतीच्या अभिलेखात सन २०२४-२५ मध्ये केवळ ३ ग्रामसभांची नोंद आढळून आली. काही सभा कोरम अभावी तहकूब होऊन नंतर घेण्यात आल्या, तर एका सभेचे इतिवृत्त व दिनांक नोंदवलेले नव्हते. सरपंचांनी आपल्या बाजूने वेगवेगळ्या सभांच्या तारखा आणि इतिवृत्तांच्या प्रती सादर केल्या. मात्र, सादर केलेल्या काही प्रती प्रमाणित नसल्याचे तसेच त्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील असल्याचे निदर्शनास आले. तसेच, दावा केलेल्या चौथ्या सभेचे रजिस्टर अधिकृतरीत्या ग्रामपंचायत अधिकार्यांकडे जमा केल्याची नोंद आढळली नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम (७) नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. सन २०२४-२५ मध्ये केवळ तीनच ग्रामसभांचे आयोजन झाल्याचे स्पष्ट झाल्याने सरपंचांनी कायद्याच्या तरतुदींचा भंग केल्याचा निष्कर्ष - काढण्यात आला. त्यानुसार, अर्जदाराचा अर्ज मंजूर करून सरपंच विश्वंभर नामदेव दळवी यांना पुढील कालावधीसाठी सरपंच पदावरून अपात्र घोषित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.