रस्सीखेच राष्ट्रीय स्पर्धेत बुलढाण्याला कांस्य राज्य स्पर्धेत दोन सुवर्णपदके

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
बुलढाणा,
buldhana players
पालघर येथील चिंचणी बीचवर २५ ते २८ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या २८ व्या सब ज्युनिअर व ३९ व्या ज्युनिअर राष्ट्रीय टग ऑफ वॉर (रस्सीखेच) स्पर्धेत महाराष्ट्र संघाने कांस्यपदक पटकावले. या संघात बुलढाणा जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश होता. यापूर्वी २० व २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याने दोन सुवर्णपदके मिळविली होती. ज्युनिअर मुलांच्या १९ वर्षे वयोगटातील ५२० किलो बीच प्रकारात बुलढाणा संघाने ठाणे जिल्ह्यावर ३-० अशी मात करून सुवर्णपदक मिळविले. तसेच १३ वर्षे वयोगटातील ३०८ किलो वजन गटातही बुलढाणा संघाने सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही संघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती. राष्ट्रीय स्पर्धेत ज्युनिअर गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर ३-० ने विजय मिळवत कांस्यपदक प्राप्त केले. सब ज्युनिअर गटातही महाराष्ट्र संघाने कांस्यपदकाची कमाई केली. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बुलढाण्याच्या खेळाडूंची २०२७ मध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेसाठी निवडीची संधी निर्माण झाली आहे. ज्युनिअर संघाचे नेतृत्व शिवराज निळे याने, तर सब ज्युनिअर संघाचे नेतृत्व आरमान परसूवाले याने केले. आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक



श्रीराम निळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश संपादन केले. विजयी खेळाडूंचा टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मदन मोहन, महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. माधवी पाटील आणि सचिव जनार्दन गुपिले यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बुलढाणा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शेषनारायण लोढे, प्रशिक्षक श्रीराम निळे, कोषाध्यक्ष योगेश शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आमरे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी खेळाडूंचे कौतूक केले.