नवी दिल्ली
E-Rickshaw Charging Suspected दिल्लीतील विश्वास नगर परिसरात रविवारी पहाटे एका घराला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. युनिटी मॉलजवळील गल्ली क्रमांक ११ मधील एका घराच्या तळमजल्यावर असलेल्या ई-रिक्षा पार्किंगच्या ठिकाणी ही आग लागली. ई-रिक्षा चार्जिंग पॉइंटमधून आगीची सुरुवात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

अग्निशमन विभागाला रविवारी पहाटे ४ वाजून १३ मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने तीन अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. यामध्ये एक वॉटर टेंडर, एक वॉटर बाउझर आणि एक क्विक रिस्पॉन्स वाहनाचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी घराच्या मधल्या मजल्यावर अडकलेल्या सहा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यापैकी चौघांना मृत घोषित केले. उर्वरित दोघे सुमारे १० टक्के भाजले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देखरेखीखाली बचावकार्य राबविण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या दुर्घटनेबाबत शाहदरा विभागाचे पोलीस उपायुक्त राजेंद्र प्रसाद मीणा यांनी माहिती दिली. विश्वास नगरमधील गल्ली क्रमांक ११ येथे आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे चार जणांचा मृत्यू झाल्याचे आढळले, तर अन्य दोघांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासानुसार, घरातील ई-रिक्षा चार्जिंग पॉइंटवरून आग सुरू झाली असावी. पहिल्या मजल्यावर झोपलेल्या नागरिकांना या आगीची झळ बसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरातील एका रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास घराला आग लागली होती. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने मोठे स्वरूप धारण केले होते. ई-रिक्षा चालविणारे काही जण भाड्याने खोली घेऊन घराच्या तळमजल्यावर राहत होते. रात्री एका ई-रिक्षाला चार्जिंगसाठी जोडण्यात आले होते. आग लागल्यानंतर ई-रिक्षामध्ये मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आल्याचेही या शेजाऱ्याने सांगितले.
ई-रिक्षाच्या चार्जिंगदरम्यान लागलेल्या आगीने काही क्षणांतच घराला विळखा घातल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आगीचे नेमके कारण आणि स्फोटामागील परिस्थिती याबाबत अधिक तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.