मालमत्तेसाठी रचला हत्येचा कट? रोहिणीतील खूनप्रकरणी पती-पत्नीला बेड्या

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi Rohini Murder Case
दिल्लीतील रोहिणी परिसरात ४४ वर्षीय महिलेची हत्या झाल्याच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. अमित आणि सुमन अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बेगमपूर पोलीस ठाणे आणि विशेष पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.



२७ नोव्हेंबर रोजी बेगमपूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने पीसीआरवर फोन करून आपली आई रेखा यांची हत्या झाल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रोहिणीतील राजीव नगर परिसरात दाखल झाले. तेथून रेखा यांना तातडीने संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर बेगमपूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रोहिणी पोलिसांनी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मोबाइल क्राइम टीम आणि रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) पथकालाही पाचारण करण्यात आले. या पथकांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. त्यानंतर तांत्रिक तपास, मोबाइल फोनच्या माध्यमातून मिळालेली माहिती आणि गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनाक्रमाच्या कड्या जोडल्या. या तपासातून अमित आणि त्याची पत्नी सुमन यांचा या हत्येशी कथित संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

रोहिणीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रेखा आणि अटक करण्यात आलेल्या दाम्पत्यामध्ये मालमत्तेवरून पूर्वीपासून वाद सुरू होता. या वादामुळे दोन्ही बाजूंमधील संबंध तणावपूर्ण झाले होते. मालमत्तेच्या याच वादातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून रेखा यांची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

अटक करण्यात आलेला अमित हा हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असून, तेथे एका खासगी व्यक्तीकडे चालक म्हणून काम करतो. त्याची पत्नी सुमन हीदेखील सोनीपतची रहिवासी असून, ती हरियाणवी कलाकार आहे. या दोघांना अटक केल्यानंतर पोलीस प्रकरणातील पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, दिल्लीतील पूर्व भागातील कोटला गावातही हत्येची दुसरी घटना घडली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्याच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीतील सलग घडलेल्या या हत्या प्रकरणांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.