ईडीचा मोठा गेम सहा ठिकाणी छापे

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
ED
गुटखा, पानमसाला आणि जर्द्याच्या कथित अवैध व्यापारातून तब्बल १ हजार ८५१ कोटी रुपयांची कमाई केल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाअंतर्गत ईडीने आसाम आणि मेघालय या ईशान्य भारतातील दोन राज्यांमध्ये एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले. गुवाहाटी, आसाममधील कामरूप जिल्ह्यातील पलासबारी आणि मेघालयची राजधानी शिलाँग येथे ही शोधमोहीम राबविण्यात आली. या प्रकरणात एका व्यावसायिकासह त्याचे कुटुंबीय आणि व्यावसायिक सहकारी तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. ईडीच्या गुवाहाटी विभागीय कार्यालय-१ कडून मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.



आसाम पोलिसांच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तक्रारीत संबंधित व्यावसायिक आणि अन्य काही व्यक्तींवर आरोप करण्यात आले आहेत. दिल्लीहून गुवाहाटीपर्यंत मोठ्या प्रमाणात गुटखा, जर्दा आणि पानमसाला रेल्वेने पाठविण्यात आल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे, या प्रतिबंधित मालाची वाहतूक कापड असल्याचे भासवून करण्यात आली होती. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात कामरूप जिल्ह्यातील अजारा रेल्वेस्थानकावर दोन रेल्वे वॅगनमधून ३४१ पाकिटे जप्त करण्यात आली होती. या घटनेनंतर अवैध व्यापाराचे मोठे जाळे उघडकीस आले.

ईडीच्या तपासानुसार, या कथित अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळविण्यात आली होती. आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत संबंधित व्यावसायिकाच्या कुटुंबीयांशी निगडित व्यक्ती आणि कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे १ हजार ८५१ कोटी रुपये जमा झाल्याचे तपास यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. संबंधित व्यावसायिकाच्या कंपन्यांकडून होणाऱ्या एकूण खरेदीपैकी जवळपास १५ ते २० टक्के खरेदी कोणत्याही अधिकृत बिलाशिवाय केली जात होती. या व्यवहारांचे पैसे रोखीने दिले जात होते. परिणामी, या आर्थिक व्यवहारांची नोंद अधिकृत लेखा खात्यांमध्ये केली जात नसल्याचा ईडीचा दावा आहे.

रेल्वे मार्गाने अवैध मालाची वाहतूक केल्याचे प्रकरण २०२३ मध्ये समोर आल्यानंतर संबंधितांनी व्यवसायाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात उघड झाले आहे. मे २०२४ मध्ये पलासबारी येथे पानमसाला आणि जर्दा निर्मितीसाठी दोन उत्पादन युनिट सुरू करण्यात आल्या. या युनिटची स्थापना नाममात्र भागीदारांच्या नावावर करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. मात्र, अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत या दोन्ही उत्पादन युनिटना संबंधित व्यावसायिकाच्या कंपन्यांकडून सुमारे ९७७ कोटी रुपये मिळाल्याचे तपासात आढळले. विशेष म्हणजे, तंबाखू आणि जर्द्याचे उत्पादन करणाऱ्या या युनिटकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) आवश्यक परवाने नसतानाही उत्पादन सुरू असल्याचा गंभीर आरोप ईडीने केला आहे.

या छापेमारीदरम्यान तपास पथकाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, साठा नोंदवही, मोबाइल फोन तसेच संबंधित उत्पादनांचे नमुना पाऊच जप्त केले आहेत. याशिवाय सुमारे ४२ लाख रुपयांची बेहिशेबी रोकडही ईडीच्या हाती लागली आहे. या साहित्याच्या आधारे आर्थिक व्यवहारांची साखळी, अवैध व्यापारातून मिळालेल्या पैशांचा स्रोत आणि त्याचा पुढील विनियोग यांचा तपास केला जाणार आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता ईडीने व्यक्त केली आहे. दरम्यान, यापूर्वी जुलै महिन्यातही ईडीने तृणमूल काँग्रेसशी (टीएमसी) संबंधित ४४० कोटी रुपयांच्या तीन बँक खात्यांवर कारवाई करत ती गोठवली होती. त्यामुळे गुटखा आणि तंबाखूच्या कथित अवैध व्यापारातून उभारलेल्या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक साम्राज्याचा तपास आता कोणत्या दिशेने जातो, याकडे लक्ष लागले आहे.