घुग्घूस,
habitual criminals जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी, महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये मोठी कारवाई केली आहे. घुग्घूस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात सहभागी असलेल्या 4 सदस्यांच्या एका सराईत गुन्हेगारी टोळीस चंद्रपूर जिल्ह्यातून 3 महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये टोळी प्रमुख शेख आसीफ शेख रसीद (40, रा. मसीहा लॉन जवळ, बिनबा गेट, चंद्रपूर), तौसिफ शेख फिरोज शेख (40 घुटकाळा वार्ड, चंद्रपूर), साजीत शेख नासीर शेख (30 वर्षे, बिजी चौक, घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर), नाझीर शेख मजीद शेख (47, रा. रहमत नगर, केजीएन मस्जीद जवळ, चंद्रपूर) यांचा समावेश आहे.
टोळी प्रमुख व त्याच्या साथीदारांनी परिसरात दहशत निर्माण करून आर्थिक लाभासाठी संघटितपणे गुन्हे करण्याची सवय लावून घेतली होती. त्यांच्याविरुद्ध घुग्घूस, मूल, रामनगर, दुर्गापूर आणि चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यामध्ये चोरी, घरफोडी, दरोडा व शिवीगाळ करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.habitual criminals त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही व सर्वसामान्य नागरिक त्यांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास पुढे येत नव्हते.
या पृष्ठभूमीवर घुग्घूसचे पोलिस निरीक्षक प्रकाश राऊत यांनी सादर केलेल्या प्रस्तावाची आणि चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौघुले यांच्या चौकशी अहवालाची दखल घेत, नोपानी यांनी 18 नोव्हेंबर रोजी या चारही आरोपींना 3 महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.