भद्रावती,
murdered संतापाच्या भरात मुलानेच आपल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी सब्बलने जीवघेणा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चंदनखेडा येथे उघडकीस आली आहे. सुरुवातीला जमिनीवर पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचणार्या आरोपी मुलाचा खोटारडेपणा शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी आणि सखोल चौकशीतून उघड झाला आहे. सुधाकर बालाजी चौखे असे मृत वडिलांचे नाव असून, त्यांचा मुलगा अमित सुधाकर चौखे (रा. चंदनखेडा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
25 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अमित घरात टीव्ही बघत आराम करीत असताना त्याचे वडील सुधाकर चौखे हे विनाकारण बडबड करून शिवीगाळ करीत होते. अमितने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र बडबड सुरूच राहिल्याने रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी सब्बलने वडिलांच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपी अमितने रक्ताने माखलेली ती लोखंडी सब्बल घराबाहेर नेऊन पाण्याने धुतली आणि पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून तो घरातून निघून गेला. त्यानंतर सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास तो पुन्हा घरी परतला आणि स्वतःला वाचवण्यासाठी तसेच गुन्हा लपवण्यासाठी वडील जमिनीवर पडून डोक्याला मार लागल्याने जखमी झाल्याचा बनाव लोकांसमोर रचला. सुरुवातीला या प्रकरणी भद्रावती पोलिस कलम 194 बीएनएसएस अन्वये नोंद करून चौकशी सुरू करण्यात आली होती.
मात्र, प्रोव्हिजनरी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण डोक्याला झालेली गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी पंच व फॉरेन्सिक चमूच्या उपस्थितीत घटनास्थळाची पाहणी केली असता, घराशेजारील टिनच्या खोलीत सिमेंट फ्लोर संपून मातीचा फ्लोर सुरू होणार्या जागी रक्ताचे डाग आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा तपशील आणि तांत्रिक व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे आरोपी अमित चौखे याची अधिक चौकशी केली असता, त्याने रागाच्या भरात लोखंडी सब्बलने वडिलांच्या डोक्यावर वार करून त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली.
या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात 27 नोव्हेंबर रोजी आरोपी अमित सुधाकर चौखे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103 (1) आणि कलम 238 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मोहन धोंगडे करीत आहेत.