इमरान हाश्मीच्या ‘गनमास्टर जी९’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
मुंबई
Gunmaaster G9
अभिनेता इमरान हाश्मी पुन्हा एकदा आपल्या अॅक्शन अवतारामुळे चर्चेत आला आहे. त्याचा ‘गनमास्टर जी९’ (Gunmaaster G9) हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट २७ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. इमरानच्या ‘आवारापन २’ला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्याच्या या नव्या चित्रपटाकडूनही चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. आता चित्रपटाच्या पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले असून, बॉक्स ऑफिसवर त्याने चांगली सुरुवात केली आहे.



‘गनमास्टर जी९’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर ३.६५ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ नोंदवत ४.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशा प्रकारे दोन दिवसांत चित्रपटाचे देशांतर्गत नेट कलेक्शन ८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इमरान हाश्मीच्या कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट म्हणूनही त्याची चर्चा होत आहे.

या चित्रपटाच्या कमाईसोबतच त्याच्या IMDb रेटिंगचीही चर्चा रंगली आहे. IMDb वर ‘गनमास्टर जी९’ला १० पैकी ९.४ रेटिंग मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी दिवसांत चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, याच दिवशी प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटाशीही ‘गनमास्टर जी९’ची बॉक्स ऑफिसवर चुरस पाहायला मिळत आहे. आयुष्मान खुराना आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केले. त्यामुळे दोन्ही चित्रपटांच्या कमाईकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

‘गनमास्टर जी९’मध्ये इमरान हाश्मीने ईश्वर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ईश्वर पूर्वी गुन्हेगारी जगतात सक्रिय असतो. मात्र, आयुष्यात घडलेल्या काही घटनांनंतर तो गुन्हेगारीचा मार्ग सोडून डेअरी फार्म सुरू करतो. पत्नी आरती आणि मुलगी जियासोबत शांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याच्या भूतकाळातील घटनांमुळे कुटुंबावर संकट ओढवते. या संकटातून कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याला पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या जगात पाऊल ठेवावे लागते. या चित्रपटात इमरानसोबत जेनेलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराना महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. आदित्य दत्त यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.