कारंजा लाड,
accident on samruddhi expressway समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी रात्री चॅनल क्रमांक १९५ जवळ भरधाव कारने समोरील ट्रकला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत विकास यांच्यासह अन्य एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आनंद, अनया आणि युवराज हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात होती. रात्रीच्या सुमारास चॅनल क्रमांक १९५ जवळ कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार समोरील ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला, तर तिघे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेच्या कारंजा समृद्धी महामार्ग आयसी-०८ पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. या पथकात पायलट अतिश चव्हाण आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आशुतोष मुठाळ यांचा समावेश होता. त्याचवेळी शेलूबाजार समृद्धी महामार्ग आयसी-०९ पथकाचे पायलट उल्हास खिल्लारे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश राठोड यांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. अपघाताची भीषणता लक्षात घेऊन दोन्ही रुग्णवाहिका पथकांनी जखमींना तातडीने प्राथमिक वैद्यकीय उपचार दिले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या आनंद, अनया आणि युवराज यांना पुढील उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.accident on samruddhi expressway तेथे वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, तिघांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारांसाठी त्यांना अमरावती येथे हलविण्यात आले.या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील प्रवाशांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
समृद्धी महामार्गावर वेगाने धावणारी वाहने, रात्रीचा प्रवास, वाहनचालकांचा थकवा आणि वाहनांवरील नियंत्रण सुटणे यांसारख्या कारणांमुळे अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. प्रत्येक मोठ्या अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत येतो; मात्र अपघातांची मालिका कायम असल्याचे चित्र आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच तत्परतेने घटनास्थळी पोहोचून जखमींना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणार्या कारंजा व शेलूबाजार येथील १०८ रुग्णवाहिका पथकांच्या कार्याचे कौतुक होत आहे.