सौदीअरेबिया,
houthi-attacks-saudi-iran-dronesमध्य-पूर्वेत तणाव आणि संघर्ष पुन्हा भडकला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून शांतता अनुभवणाऱ्या या प्रदेशात पुन्हा एकदा हल्ल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. तर इराणने आपल्या लष्करी क्षमतेचे प्रदर्शन केले. इराणने तीन नवीन लहान मानवरहित ड्रोन जगासमोर आणली आहे. यामुळे वाद आणि तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हुती बंडखोरांनी शनिवारी दावा केला की, त्यांनी गेल्या 48 तासांत सौदी अरेबियातील अनेक महत्त्वांच्या ठिकाणांवर हल्ला चढवला आहे. हुतींच्या दाव्यानुसार, राजधानी रियाद येथील किंग खालीद आंतरराष्ट्रीय विमानतळ, जाजान तेल रिफायनरी तसेच दक्षिण सौदी अरेबियातील दोन वीज केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. या ताज्या हल्ल्यामुळे या क्षेत्रातील शांतता प्रक्रियेला जबर धक्का बसला आहे. अमेरिका आता काय कारवाई करणार, इस्त्रायल कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे इराणने त्यांची युद्ध क्षमता वाढवण्यावर भर दिला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या एरोस्पेस फोर्सने ड्रोन तंत्रज्ञानाची क्षमता दाखवली. तस्नीम वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, आयआरजीसीने शनिवारी ईशान्य इराणमधील मशहद शहरात आयोजित एका प्रदर्शनात तीन नवीन लहान मानवरहित ड्रोन जगासमोर आणली. यापैकी एक ड्रोन शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तर उर्वरीत दोन ड्रोन जवळच्या लढाईत शत्रूच्या लष्करी युनिट्सवर आत्मघाती हल्ले करण्यासाठी विकसीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.