भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू

    दिनांक :29-Nov-2026
Total Views |
रामगड
jharkhand road accident
पत्नीची शिक्षिका पदावर निवड झाल्याचा आनंद आणि त्यानिमित्ताने देवदर्शनाला जाण्याचा उत्साह... संपूर्ण कुटुंबासाठी हा दिवस आनंदाचा ठरणार होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नव्या नोकरीच्या आनंदात आई छिन्नमस्तिकेच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या प्रवासाचा भीषण अपघातात अंत झाला. झारखंडमधील रामगड जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील सहा सदस्यांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील जांघरो गावासह दोन्ही राज्यांमध्ये शोककळा पसरली आहे.



ही हृदयद्रावक घटना झारखंडमधील रामगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३३ वरील रांची-पाटणा मार्गावर कुजू ओपी हद्दीतील पैंकी परिसरात घडली. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील बेन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांघरो गावचे रहिवासी विवेकानंद हे पत्नी अमृता कुमारी, तीन मुले आणि आईसह रामगडमधील रजरप्पा येथील प्रसिद्ध माँ छिन्नमस्तिके मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. विवेकानंद हे माँ सरस्वती विद्या मंदिर या शैक्षणिक संस्थेचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी अमृता कुमारी यांची अलीकडेच बिहारमध्ये शिक्षिका पदावर निवड झाली होती. या यशाबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने मंदिरात पूजा करण्याचे ठरवले होते. या धार्मिक प्रवासात काही नातेवाईकही सहभागी झाले होते.

विवेकानंद यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक मिळून एकूण १४ जण स्कॉर्पिओ गाडीतून प्रवास करत होते. गाडीत विवेकानंद, पत्नी अमृता, मुलगे शुभम कुमार आणि अमन कुमार, मुलगी सोनाली कुमारी तसेच आई प्रमिला देवी यांचा समावेश होता. याशिवाय नातेवाईक मुकेश कुमार, किरण कुमारी, करण कुमार, वैष्णवी कुमारी, सिंटू कुमार आणि राजेश कुमार हेही प्रवास करत होते. नंदन आणि चंदन कुशवाहा हे दोघे चालक म्हणून गाडीत उपस्थित होते. पांढऱ्या रंगाच्या या स्कॉर्पिओचा नोंदणी क्रमांक BR 21P 6331 असा होता.

रजरप्पा मंदिराकडे जात असताना पैंकी परिसरात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका अज्ञात वाहनाला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. वाहनातील प्रवासी आतमध्ये अडकले. अपघातानंतर घटनास्थळी मोठा आक्रोश सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

अपघाताची माहिती मिळताच कुजू पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवून अपघातातील जखमी आणि इतर प्रवाशांना रामगड सदर रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर १३ जणांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत चंदन कुशवाहा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.

या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या अमृता कुमारी यांच्या शिक्षिका पदावरील निवडीचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबीयांनी देवदर्शनाचा बेत आखला होता, त्याच आनंदाचे रूपांतर काही क्षणांत मोठ्या शोकांतिकेत झाले. अपघाताची बातमी जांघरो गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली. अनेक कुटुंबांतील सदस्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामगडचे जिल्हाधिकारी ऋतुराज, पोलीस अधीक्षक मुकेश कुमार लुनायत यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आणि सदर रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची परिस्थिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांसह बचावकार्य आणि आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना दुर्घटनेची माहिती देण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरू करण्यात आली.

दरम्यान, मृत्यू झालेल्या सर्व १३ जणांचे मृतदेह रामगड सदर रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच मृतांचे नातेवाईक आणि नालंदा जिल्ह्यातील जांघरो गावचे ग्रामस्थ रामगडमध्ये दाखल झाले. शवविच्छेदनगृहाबाहेर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. एकाच वेळी अनेक जवळच्या व्यक्तींना गमावल्याच्या धक्क्याने कुटुंबीयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.

याबाबत कुजू ओपीचे उपनिरीक्षक आर. एन. शर्मा यांनी सांगितले की, शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार रामगड पोलीस मृतदेहांसह बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील जांघरो गावात जाणार असून तेथे मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

एका बाजूला गंभीर जखमी चंदन कुशवाहा याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दुसरीकडे १३ जणांच्या मृत्यूने जांघरो गावातील प्रत्येक घरावर दुःखाचे सावट पसरले आहे. पत्नीच्या यशानिमित्त आई छिन्नमस्तिकेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघालेल्या कुटुंबाचा हा प्रवास काळाच्या घावाने कायमचा संपवला. आनंदाचा सोहळा साजरा करण्यासाठी निघालेल्या या कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.