छत्तीसगड
Kanker Naxal Surrender छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले आहे. एकूण २० लाख रुपयांचे इनाम असलेल्या पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये विभागीय कमांडर चंदर याच्यासह दोन एरिया कमांडर आणि दोन पक्ष सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपली स्वयंचलित शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द केली. या घटनेला नक्षलवादाच्या नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

कांकेरचे पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही नक्षलवाद्यांनी कांकेर पोलिसांसमोर शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर एकूण २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, याच महिन्यात छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातही सुरक्षा दलांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेला स्फोटकांचा मोठा साठा शोधण्यात यश आले होते. उसूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुजारीकांकेर जंगलात संयुक्त शोधमोहीम राबविताना हा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये बॅरल ग्रेनेड लॉन्चरचे (बीजीएल) ५० सेल आढळले होते. या सेलचा वापर नक्षलवादी आयईडी स्फोटके तयार करण्यासाठी तसेच सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी करू शकत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. वेळेत हा साठा जप्त झाल्याने संभाव्य मोठा हल्ला टळल्याचे मानले जात आहे.
पुजारीकांकेर जंगलात नक्षलवाद्यांनी स्फोटके लपवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उसूर, आवापल्ली आणि पामेड पोलीस ठाण्यांच्या पथकांसह केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम सुरू केली. जंगलातील काही संशयास्पद ठिकाणांची ओळख पटवून तेथे सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी जमिनीत लपवून ठेवलेले बीजीएलचे ५० सेल आढळून आले. या जप्तीप्रकरणी उसूर पोलीस ठाण्यात आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली.यापूर्वी याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सुकमा जिल्ह्यातही पोलिसांनी नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे, ग्रेनेड आणि लॉन्चर हस्तगत करण्यात आले होते. कांकेरमधील पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण आणि बीजापूरमधील स्फोटकांचा साठा जप्त होणे, या दोन्ही घटनांमुळे छत्तीसगडमधील नक्षलवादविरोधी मोहिमेला महत्त्वाचे यश मिळाल्याचे चित्र आहे.